जो मनुष्य दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, त्याची संपन्नता लाभदायीच ठरते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तापापहे सहृदये रुचिरे प्रबुद्धे मित्रानुरागनिरते धृतसङ्गुणौघे । स्वाङ्गप्रदानपरिपूरितषट्पदौघे युत्तं तवेह कमले कमले स्थितिर्यत्।।

हे लक्ष्मीदेवी, गुणांनी शीतल असणाऱ्या, सुंदर, पूर्ण विकसित झालेल्या, सूर्याच्या प्रेमात रममाण होणाऱ्या, अनेक उत्तम गुणांनी युक्त असलेल्या आणि आपल्या शरीरातील मकरंद देऊन भुंग्यांच्या समुदायाला तृप्त करणाऱ्या अशा कमळामध्ये तू निवास करतेस, हे अगदी योग्यच आहे.

या अन्योक्तीमध्ये कवीने कमळाचे वर्णन करताना त्याच्या गुणांच्या माध्यमातून सज्जन आणि उदार व्यक्तीचे गुण सूचित केले आहेत. जो मनुष्य दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, संवेदनशील असतो, ज्ञानसंपन्न असतो, मित्रांवर प्रेम करतो, सद्गुणांनी युक्त असतो आणि स्वतःजवळील संपत्तीचा उपयोग इतरांसाठी करतो, त्याच्याजवळ लक्ष्मीने निवास करणे योग्य आहे, असे इथे श्लेषातून सुचवले आहे.

– डॉ. समिरा गुजर-जोशी