
>>सुधाकर वसईकर
तिसरा डुळा’ या किरण येले लिखित व ग्रंथाली प्रकाशन प्रकाशित कथासंग्रहातील ‘प्रॉपर्टी एक्सिबिशन’ आणि शीर्षक कथा या दोन कथा दिवाळी विशेषांकात पूर्वीच वाचल्या होत्या. तेव्हापासून, ‘तिसरा डुळा’ कथेतील जगल्या, मंगळी, म्हादू, वॉचमन, पुढारी, एशिपी, म्हादूचा भगवान बालशंकर ही पात्रे मनात फेर धरू लागली होती. ती अजूनही मनात रेंगाळतायेत. अपयशी, अपमानित, अवहेलनेचचं जगणं जगणाऱया दुःखीकष्टी माणसांना बेमालूमपणे संपवलं जातंय आणि तरी ही माणसं आपली गोष्ट जगाला कधीच सांगू शकणार नाहीत. लेखक हे पुरतं जाणून आहे. म्हणूनच लेखक त्यांची गोष्ट सांगू पाहतोय. जीवन भले वेदनेने भरलेलं असो, तरी ते जगण्यासाठी चाललेली कुतरओढ कमालीची शोषिक आहे. हृदयाला हात घालणाऱ्या, काळीज पिळवटणाऱ्या सर्वच गोष्टींतील पात्रांचं मानसशास्त्रीय पातळीवर केलेलं विश्लेषण थक्क करणारं आहे.
‘झुंबर’ कथेत श्रीमंतीच्या झगमगाटी हव्यासापुढे वरातीतील अपमान साहणाऱ्या धनकूची मजुरीसाठी चाललेली धडपड कस्पट ठरते. संपतीच्या विषम वाटपाचा बळी शेवटी गरीबच ठरतो हे हृदयद्रावक वास्तव प्रचंड अस्वस्थ करते. हिंदू आई आणि मुसलमान वडील असलेल्या इसाकची हिंदू धर्मावरील अपार श्रद्धा अचानक उसळलेल्या दंगलीने कशी बदलते आणि तो शेवटाला धर्मांतर करतो हे ‘इसाक पक्का हिंदू होता’ या कथेत प्रखरतेने येते. मनाने सच्चे, निर्मळ असलेले, ज्यांचा दंगलीशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी, ते केवळ धार्मिक उन्मदापोटी कट्टरतेकडे कसे झुकतात याचं प्रत्ययकारी चित्रण चटका लावून जातं. ‘प्रॉपर्टी एक्सिबिशन’ कथेत सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे भावनिक प्रश्न अनाहूतपणे एक्झिबिट झाले आहेत. कथेत मशीन ऑपरेटरचं उपकथानक आहे. चाकरमानी जावळे आपल्या रंभा म्हशीवर अतोनात प्रेम करीत असतो आणि निर्जीव रिबीन मशीनवरही तितकंच प्रेम करतो. पण टॉवर संस्कृतीपायी कंपनी जमीनदोस्त होते. ह्याने मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला तो नित्यनेमानं कामावर यावं तसं येत राहातो. केवळ निर्जीव आणि सजीवच आजच्या विकासाचे हकनाक बळी नव्हेत तर माणूसही उद्ध्वस्त होतोय या जाणिवेने वाचकाच्या वाटय़ाला प्रचंड अस्वस्थता येते. बंबईया बोलीभाषेतील संभाषणातून धावत्या लोकलच्या लगेज डब्यात घडत गेलेली ‘असुविधा के लिए खेद हैं’ ही कथा एका स्थलांतरित युवकाचं महानगरातील बिनधास्त जगण्याचं वास्तववादी दर्शन घडवते.
महानगरीय जीवनशैलीचं यथार्थ चित्रण करणाऱ्या या कथा वैशिष्टय़पूर्ण आहेत. अनोखी कथनशैली, प्रचंड क्षमतेनं आलेलं सभोवताल अवलोकन, जिवंत व्यक्तिचित्रण, बोलीभाषेची असलेली जाण, वातावरणनिर्मितीचे अप्रतिम कसब तर थक्क करणारं असून, प्रसंगानुरूप गद्यलेखन शैलीतलं ओघवतेपण कथावकाश भारावणारं आहे. अभावग्रस्तता आणि भुकेची व्याकुळता याची पृष्ठभूमी असलेल्या वास्तववादी कथा संग्रही ठेवाव्या अशा आहेत. कथेमागची कथा सांगताना, तपशिलाने येणारे उपकथानक कथेस पूरक ठरते. म्हणूनच या कथा मनाचा ठाव घेतात. मानवी नाते संबंधांवर भाष्य करणारा अनेक पुरस्कारप्राप्त ‘मोराची बायको’ हा त्यांचा पहिला कथासंग्रहही खूप चर्चीला गेला तो अनोख्या संवाद लेखनशैलीमुळे! या कथासंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी रेखाटले आहे. संपलेल्या माणसांची दखल घेऊन माणूसपणाची कास धरणाऱ्या या कथा वाचण्यासाठी ‘तिसरा डुळा’ वाचकाला मिळालाय हे मात्र खरंय.
तिसरा डुळा
लेखक – किरण येले
प्रकाशक – ग्रंथाली
पृष्ठ – 193, मूल्य – रु. 250/-






























































