
यूट्यूबवर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. कुणी त्याचा वापर केवळ मनोरंजनासाठी करते तर कुणी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी. यूटय़ूबला गुरू मानून आसामच्या करिमगंजमधील अवघ्या 19 वर्षीय सम्राट नाथ या तरुणाने कमाल करून दाखवली आहे. सम्राटने ऍण्टी थेफ्ट ई-सायकल तयार केली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने एक ऍप विकसित केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण या ई-सायकलवर नियंत्रण ठेवू शकतो, असा दावा त्याने केला आहे.
सम्राट आठवीत शिकत असताना त्याच्या मामाची सायकल चोरीला गेली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या घटनेमुळे त्यांना धक्का बसला. सायकल चोरी रोखण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. पुढे त्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेतला आणि सायकल चोरी रोखणाऱया उपकरणांवर काम सुरू केले. पैशांची कमतरता ही त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरत होती. मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करून जमवलेल्या पैशांतून त्याने एक जुनी साधी सायकल विकत घेतली आणि या सायकलचे रूपांतर त्याने ऍण्टी थेफ्ट ई-सायकलमध्ये केले आहे. त्यासाठी लागणारे सर्किट बनवण्यासाठी त्याने यूटय़ूबची मदत घेतली. चार वर्षे कोडिंगचे धडे गिरवल्यानंतर त्याने आपल्या स्वप्नातली सायकल साकारली आहे. या सायकलचे पेटंट घेऊन लोकांना परवडणाऱया दरात ई-सायकल उपलब्ध करून देण्याचे त्याचे ध्येय आहे.
सम्राटने तयार केलेल्या ई-सायकलमध्ये लिथियम आयर्न बॅटरी असून जी जुन्या लॅपटॉपपासून रिसायकल केली आहे. सिंगल चार्ंजगमध्ये ही सायकल 60 किमी अंतर कापू शकते. तिचा टॉप स्पीड ताशी 40 किमी एवढा आहे.
कुणी माझी इलेक्ट्रिक सायकल चोरी करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मोबाईलवर मेसेज येईल आणि सायकलवरील अलार्म सक्रिय होईल. त्याशिवाय मी एक ऍप विकसित केले आहे, ज्याच्या मदतीने जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मी सायकलवर नियंत्रण ठेवू शकतो. लाईव्ह लोकेशनदेखील ट्रक होऊ शकते. अधिक सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरदेखील बसवले आहे.
– सम्राट नाथ, विद्यार्थी
























































