सामूहिक विवाहाने परळीत शिवजन्मोत्सव साजरा; परळीत शिवसेनेचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी शिवसेनेच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतुन सहा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात करण्यात आला. या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हजारो महिला पुरुषांच्या साक्षीने झाले. शिवशाहीर साईनाथ पाटील यांच्या शिवचरित्राने या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. अनेक वर्षांपासून परळीत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता मोंढा मैदान हनुमान मंदिरासमोर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिंदे यांच्या निवासस्थानापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवरदेवांच्या घोड्यावरून ढोल ताशांच्या गजरात शेवंती काडून मोंढा मैदान येथे या मंगलमय विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक,जिल्हा परिषद गट नेते अजय मुंडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख,बाजीराव धर्माधिकारी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर,शिवसेना विधानसभा प्रमुख राजाभैया पांडे, नारायण सातपुते,प्रकाश मराठे, तुळशीराम पवार,शिवसेना माजलगाव तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव,अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे,गजानन मुडेगावकर,अनंत गित्ते,संभाजी मुंडे, महादेव शिंदे,रामप्रसाद गरड,श्रीराम लांडगे, सतीश जगताप आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

या विवाह सोहळ्याने परळीकरांना भुरळ घातली. शिस्तबद्ध नियोजन भव्य मंडप, मन भारावून टाकणारी सजावट यासह अनेक बाबींमुळे हा सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश शिंदे यांनी तर सूत्रसंचलन शिवसेना जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, युवा सेना समन्वयक संतोष चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते, तुकाराम नरवाडे, अनिल शिंदे, महिला आघाडीच्या विमलताई गायकवाड, लक्ष्मी सरवदे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी मेहनत घेतली.