
लॉकडाऊन काळात एसटी वाहतूक बंद असल्याने तोट्यात असलेल्या एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटीने गेल्यावर्षी स्वीकारला होता. आता तर गौण खनिज व वाळू वाहतूकही एसटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. शनिवारी मालवण तोंडवळी येथून वाळू भरलेली एसटी कोल्हापूर येथे रवाना झाली.
दरम्यान, एसटी प्रशासनाच्या या निर्णयाचे वाळू व्यावसाईकांनी स्वागत केले आहे. लॉकडाऊनमुळे वाळू व्यवसायही अडचणीत आला असताना एसटी प्रशासनाचा नवा उपक्रम वाळू व्यवसायाच्या दृष्टीनेही हिताचाच असल्याचे व्यवसाईकांनी सांगितले आहे.
रीतसर वाळू वाहतूक पास घेऊन त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रति किलोमीटर निश्चित दरानुसार ही वाहतूक केली जात आहे. अशी माहिती मालवण एसटी आगर व्यवस्थापक नरेंद्र बोथे यांनी माहिती देताना सांगितले. मालवण तालुक्यात कालावल व कर्ली खाडी पट्ट्यात शासनाने निश्चित करून दिलेल्या वाळू पट्ट्यात वाळू लिलाव घेऊन वाळू उत्खनन होते.
बांधकाम क्षेत्रात प्रामुख्याने उपयोगात येणारी ही वाळू सिंधुदुर्गसह कोल्हापूर व अन्य लगतच्या जिल्ह्यात नेली जाते. डंपर, ट्रक यांच्या माध्यमातून होणारी वाळू वाहतूक आता एसटीच्या माध्यमातून होणार असल्याने वाळू वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.






























































