धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णासह रुग्णवाहिकाच पळवून नेली

कोरोनाबाधित रुग्णाला उपचारांसाठी पुण्याला घेऊन निघालेली रुग्णवाहिका रुग्णासह पळवून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात सोमवारी रात्री घडली आहे. दरम्यान, घारगाव पोलिसांनी काही तासांतच रुग्णवाहिका पळविणाऱयाला अटक केली आहे. रुग्णवाहिका पळवण्याचे कारण मात्र अद्यापि समजलेले नाही. वैभव सुभाष पांडे (रा. जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, पो. साकूर, ता. इगतपुरी, जि. नाशिक) हा रुग्णवाहिका चालक असून, तो सोमवारी कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या नातेवाईकाला घेऊन पुणे येथे जात होता. रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घारगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मी येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी थांबला होता. पेशंटचे नातेवाईक लघुशंकेसाठी रुग्णवाहिकेतून खाली उतरले होते. त्याच वेळी एका व्यक्तीने रुग्णासह रुग्णवाहिका घेऊन पोबारा केला. चालक व नातेवाईक रुग्णवाहिकेजवळ आले असता त्याठिकाणी रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे ते घाबरून गेले. त्यांनी घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील, राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आळेफाटा, संगमनेर आदी ठिकाणी फोन करून रुग्णवाहिकेची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका संगमनेर येथे असल्याचे समजताच घारगाव पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन ही रुग्णवाहिका ताब्यात घेत योगेश रोंगटे याच्याकडे दिली. यानंतर रोंगटे हे रुग्णाला घेऊन पुण्याला गेले. याप्रकरणी योगेश रोंगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वैभव सुभाष पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या