
दगडखाणीतील विहिरीत बुडून सख्ख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात शनिवारी दुपारी घडली आहे. समाधान जालिंदर भडांगे (वय 12) व सुरेश जालिंदर भडांगे (वय 10) अशी मृत भावंडांची नावे आहेत.
कौठे कमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीकच्या खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान व सुरेश हे शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी खाणीकडे गेले होते. दरम्यान, यातील एक शेळी पाण्यात पडली, तिला वाचविण्यासाठी समाधान पाण्यात उतरला असता, तो पाण्यात बुडाला. भाऊ पाण्यात बुडाल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी सुरेश हाही चिमुकला पाण्यात उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सोबत असलेल्या काही मुलांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी कौठे कमळेश्वर गावात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर, उपसरपंच नवनाथ जोंधळे यांच्यासह ग्रामस्थांनी खाणीकडे धाव घेतली. पदाधिकारी व ग्रामस्थांनी दोघाही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


























































