सांगलीतील द्राक्षांचा गोडवा परदेशात टिकून, यंदाच्या हंगामात दहा हजार टन द्राक्षांची निर्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचा गोडवा परदेशात चांगलाच टिकून आहे. कॅनडा, रशिया, थायलंड, मलेशिया, चीन आदी देशांमध्ये यंदाच्या हंगामात आजवर 715 कंटेनर्समधून नऊ हजार 724 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

कोरोनाचे संकट आणि प्रतिकूल निसर्ग यावर मात करीत द्राक्ष उत्पादक शेतकऱयांनी आपल्या द्राक्षबागा वाचवल्या. त्याचबरोबर यावेळी द्राक्ष उत्पादनही मोठय़ा प्रमाणात करण्यात यश मिळवले. सांगली जिह्यातील जवळपास 2650 शेतकऱयांनी द्राक्ष निर्यातीसाठी नवीन नोंदणी केली आहे. तर, 1994 शेतकऱयांनी निर्यातीसाठी परवाना नूतनीकरण केले आहे.

जिह्यातील जवळपास 2256 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांची निर्यात होणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा एक हजार हेक्टरनी वाढ झालेली आहे. सिडलेस थॉमसन अशा द्राक्षांना मोठी मागणी आहे. युरोपबरोबरच कॅनडा, चीन, कतार, रशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती आदी देशांमध्ये ही द्राक्षांची निर्यात मोठय़ा प्रमाणात झाली आहे. सोनाका, सुपर सोनाका, शरद सिडलेस आदी वाणाला या ठिकाणी जादा मागणी वाढली आहे.

केंद्राने अनुदान बंद केल्याने निर्यात खर्च वाढला

द्राक्षांची निर्यात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून द्राक्ष निर्यातीवर कंटेनरला एक लाखाचे अनुदान मिळत होते, ते बंद केल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा निर्यात खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱयांना या हंगामात कमी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पूर्वीप्रमाणे कंटेनरला निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणीही द्राक्षबागायतदारांकडून होत आहे.