सांगली महानगरपालिका क्षेत्रात ऑनस्पॉट ऑण्टिजेन टेस्टिंग सुरू, आयुक्तांसह महापालिकेचे पथक उतरले रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने शुक्रवारपासून महापालिकेकडून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात ऑनस्पॉट रॅपिड टेस्टिंग सुरू करण्यात आली. यासाठी स्वतः मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह आरोग्य टीमने रस्त्यावर उतरून सांगली शहरातील बाजारपेठेत नागरिक, व्यापारी, कामगार यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी केलेल्या 200 जणांची रॅपिड टेस्ट सुदैवाने निगेटिव्ह आली.

सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्यावरील गर्दीमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई सुरू केली. गर्दी होणाऱया आस्थापनांमध्ये ग्राहक तसेच कामगारांची रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. यासह विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाईबरोबरच कोरोना चाचणीही केली जात आहे. वैद्यकीय टीम आणि टेस्टिंग युनिटने पीपी किटसहित बाजारपेठेत आज 200 नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आले नाही.

या मोहिमेत आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर कांबळे, प्रणिल माने, गणेश माळी, वैभव कुदळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे आदींच्या पथकासह जामवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय स्टाफने सहभाग घेतला होता.

महापालिका क्षेत्रात संसर्ग वाढत आहे. नागरिकांकडून अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली असून, यामुळे संसर्ग बळावण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱयांची रॅपिड चाचणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखायची असेल, तर नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे.

– नितीन कापडणीस, मनपा आयुक्त, सांगली.