
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पहिल्या लढतीत वेस्ट इंडीजविरुद्ध पराभव सहन कराव्या लागलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या लढतीत इंग्लंडवर 14 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयानंतर हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिने ट्वीट करून पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले. सानियाच्या या ट्वीटनंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले असून 16 जून रोजी होणाऱ्या लढतीत कोणाला पाठिंबा देणार असा बोचरा सवालही केला आहे.
पाकिस्तानच्या विजयानंतर सानियाने ट्वीट केले की, ”पाकिस्तानच्या संघाचे विजयासह जोरदार पुनरागमनासाठी अभिनंदन. सामना नेहमीप्रमाणे दमदार झाला. क्रिकेट वर्ल्डकप हळूहळू रंगत आहे.” या ट्वीटनंतर नेटिझन्सने सानियाला 16 जून रोजी होणाऱ्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लढतीवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युझर्सने सानियाला विचारले की, सानिया वहिनी, मला नेहमीच हे जाणून घेण्याची इच्छा असते की हिंदुस्थान आणि पाकिस्तान लढतीदरम्यान कोणत्या संघाला पाठिंबा देणार?

याआधी सोमवारी झालेल्या लढतीमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 348 धावांचा डोंगर उभारला. यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 9 बाद 334 धावांवर रोखत 14 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या वर्ल्डकपमधील पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.




























































