संजय दत्त होणार अमली पदार्थविरोधी मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

सामना ऑनलाईन , डेहराडून

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थान या सहा राज्यांतील अमली पदार्थविरोधी मोहिमेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याची तयारी अभिनेता संजय दत्तने दाखविली आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी सांगितले.

अमली पदार्थांच्या संकटाशी सामना करण्यासाठी वरील सहा राज्यांसह केंद्रशासित प्रदेश चंदिगडने एक संयुक्त व्यूहरचना तयार केलेली आहे. अमली पदार्थांच्या होणाऱ्या दुष्परिणामांविषयीची जनजागृती तरुणांमध्ये एका मोहिमेद्वारे केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासह चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन राज्यांच्या प्रतिनिधींची गेल्या महिन्यात चंदिगडमध्ये बैठक झाली. या बैठकीत अमली पदार्थविरोधी व्यूहरचनेवर चर्चा करण्यात आली. अमली पदार्थविरोधी मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सहा महिन्यांनी दर सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे असे स्पष्ट करण्यात आले.

अमली पदार्थांच्या व्यसनाचा संजय दत्तला फटका बसला

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले, मी मुंबईच्या दौऱ्यावर असताना अभिनेता संजय दत्तला मी दूरध्वनी केला. तेव्हा तो बाहेरगावी होता. त्यावेळी त्याने अमली पदार्थविरोधी मोहिमेचा सदिच्छादूत, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली. संजय दत्त या दरम्यान म्हणाला की, अमली पदार्थांच्या व्यसनाने आपल्या करियरचे पूर्वी फार मोठे नुकसान झाले आहे. आता अमली पदार्थविरोधी मोहिमेचा सदिच्छादूत होऊन आपण आपले योगदान देण्यास तयार आहोत.