
सामना ऑनलाईन । मुंबई
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला कमावला असून बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जात आहे. आता संजय दत्तच्या चाहत्यांना लवकरच त्याच्या आयुष्याची पानं पुस्तकरुपात वाचता येणार आहे.
संजय दत्तने आत्मकथा लिहिण्याचे ठरवले असून पुढील वर्षी वाढदिवसाला (२९ जुलै) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील ज्या पानांना दाखवण्यात आले नाही ती पानं त्याच्या आत्मकथेतून उलगडून पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. या आत्मकथेला संजय दत्त ‘हार्पर कॉलिन्स’च्या सहाय्यतने प्रकाशित करणार आहे.
याबाबत बोलताना संजय दत्त म्हणाला की, ‘मी एक असाधारण आयुष्य जगलो आहे. माझे आयुष्य अनेक चढ-उतार, सुख-दु:खांनी भरलेले आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी अनेक रोमहर्षक गोष्टी आहेत ज्या मी आतापर्यंत कोणालाही सांगितलेल्या नाहीत. मी माझ्या आठवणी तुमच्यासोबत वाटण्यासाठी उत्साहीत आहे.’
संजय दत्तच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेकांनी लिखान केले आहे. परंतु प्रथमच स्वत: संजय दत्त आपल्या आयुष्याला पुस्तकरुपात बंदीस्त करणार आहे. त्यामुळे या पुस्तकातून बॉलिवूड पदार्पणापूर्वीचे जीवन, रॉकीच्या रुपात बॉलिवूडमध्ये केलेले पदार्पण आणि त्याचवेळी आई नरगिसला गमावल्याचे दु:ख, ड्रग्ज आणि नशेच्या व्यसनासोबतचे युद्ध, अनेक महिलांसोबतचे संबंध, कायदेशिय लढाई, तुरुंगातील दिवस, तसेच सुनील दत्त यांच्यासोबतचा काळ, बॉलिवूडमधील प्रसिद्धी आणि ग्लॅमर, तुरुंगातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरील पुनरागमन आणि त्यावेळी मानसिक स्थिती, वैवाहिक जीवन याबाबत या पुस्तकातून खुलासा होण्याची शक्यता आहे.
























































