हे ‘चोरमंडळ’ घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही; संजय राऊत यांचा मिंधे गटाला खणखणीत इशारा

दादा भूसे यांनी गिरणा कारखान्याच्या नावावर गोळा केलेले 175 कोटी रुपये कुठे आहेत, तो कारखाना कुठे आहे? असे म्हणत चोराला चोर म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा खडा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून शिवसेना चोरणारे चोरच आहेत. दिल्लीत गौतम अदानी यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमचा आवाज बंद करण्यात आला. राहुल गांधी यांची खासदारकी गेली. संजय राऊत बोलू नयेत म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. हे चोरांचेच काम आहे. हे चोरांचेच राज्य आहे, हे चोरमंडळच आहे. हे चोरमंडळ घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत आणि याची सुरुवात मालेगावातून होईल, असा खणखणीत इशारा राऊत यांनी मिंधे गटाला दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावात पोहोचलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले.

मालेगावच्या सभेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला येथे फार मोठी ताकद प्राप्त झालेली आहे. गद्दारीचे जे काही प्रकरण घडले त्यानंतर या भागातील शिवसेनेमध्ये आणि शिवसेनाप्रेमींमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. तो उद्रेक या सभेतून दिसेल. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी, महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवर त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे. गद्दारीमुळे जनतेच्या मनातील चीड मालेगावच्या सभेत पहायला मिळेल. ही सभा मालेगावात, उत्तर महाराष्ट्रात असली तरी ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. कारण या मालेगावातून जो संदेश जाईल तो महाराष्ट्राला आणि देशालाही जाईल, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राऊत पुढे म्हणाले की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलले की, आम्हाला खोकेवाले का बोलता? आम्हाला मिंधे का बोलता? हा प्रश्न त्यांनी स्वत:च्या मनाला विचारायला हवा. संपूर्ण महाराष्ट्रात तुमची काय छी-थू होतेय. ही छी-थू नष्ट करायची असेल तर तुम्हाला निवडणुकीला सामारे जावे लागेल. ज्या शिवसेनेच्या ताकदीवर, ज्या ठाकरे नावावर तुम्ही निवडून आला आहात, त्यांच्याशी तुम्ही जी बेईमानी केली त्यामुळे लोकं तुमच्यावर चिडले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शहाणे असाल आणि खरोखर इमानदार, क्रांती किंवा बंड केले असे जे म्हणता ते खरे असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. मग खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाल्यांची कोणती हे स्पष्ट होईल.

आम्ही सावरकर भक्त आहोत!

भक्त हे अंधभक्त असू नयेत. विशेषत: गेल्या काही वर्षात मोदी यांचे अधभक्त निर्माण झालेले आहेत. मी सावकरांचा उल्लेख केला आणि आमच्यावर कोणी किती टीका केली तरी आमचे सावरकर प्रेम कमी होणार नाही. वीर सावकरांना ज्या परिस्थितीमध्ये शिक्षा झाली तेव्हा त्यांना अपिलाची संधीच नव्हती. तेव्हा इंग्रजांचे कायदे होते. त्यामुळे सावकरांची तुलना कधी कोणासोबत करू नये. शिवसेना ते सहन करणार नाही. आम्ही वीर सावकरांचे भक्त आहोत आणि राहणार, असेही ते ‘दै. सामना‘च्या आजच्या अग्रलेखावरील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

इंदिरा गांधींप्रमाणे राहुल गांधींचे नेतृत्व उजाळून निघेल

राहुल गांधी यांना जेव्हा शिक्षा सुनावली तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. आम्हीही माफी मागितली नाही. माफी मागून तुरुंगातून सुटता आले असते. भाजप, मिंधे गटापुढे गुडघे टेकले असते तर तुरुंगात जाणे टळले असते. किंवा ज्या पद्धतीने खटले टाकून आम्हाला जेरीस आणले जातेय त्यातून सुटका करता आली असती, पण आम्ही तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. अनेक लोकं आहेत जे झुकत नाहीत, वाकत नाहीत. राहुल गांधी हे देखील परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्यांनी जुलमी सरकारपुढे झुकण्यास नकार दिला आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावले. इंदिरा गांधींप्रमाणे राहुल गांधींचे नेतृत्व उजाळून निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली हा सरळसरळ लोकशाहीवरील आघात आहे. हा देश हुकुमशाहीपर्यंत पोहोचलेला आहे, असेही ते म्हणाले.