
महाराष्ट्रातून आणि देशातून एकत्रितपणे मोदींची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबतच आहेत, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत बोलत होते.
महाविकास आघाडीची चर्चा झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ते म्हणाले की, आज महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भात आणि पुढली रणनीती ठरवण्यासंदर्भात बैठक पार पडली. आजच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, मी स्वतः होतो. आणि मुख्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरही या बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीतील चार पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. 48 जागांवर चर्चा झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. एकाही जागेविषयी मतभेद नाही. आज प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या जागांसंदर्भात एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावरसुद्धा चर्चा झाली. आम्हा सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असावा आणि आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं हे ठरलं आहे. कुठल्या पक्षाच्या किती जागा असतील याविषयी जी घोषणा आहे ती आम्ही एकत्र बसून करू. कुणीही वैयक्तिकरित्या घोषणा करणार नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचं एका गोष्टीबाबत पूर्ण समाधान आहे की, महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकूमशाही उलथवून टाकायची. आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला हवं याविषयी त्यांचंही एकमत आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.





























































