गद्दारांचे शहर हा ठाण्याचा कलंक पुसून टाकणार, संजय राऊत यांचा निर्धार

एकेकाळी मंदिरे, तलाव आणि कलावंतांचे शहर अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक ठाण्यात बिल्डरांच्या दरोडेखोरीने धुमाकूळ घातला आहे. शाळा, कॉलेजना ड्रगमाफियांचा विळखा पडला आहे. एक अख्खी पिढी नासवली जात आहे. ठाणे बीडच्याही पुढे गेले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर ठाणेकरांनो, जागरूक राहून मतदान करा, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. गद्दारांचे, ड्रगमाफियांचे शहर हा ठाण्याला लागलेला कलंक पुसून टाकणारच, असा निर्धारही यावेळी खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा गैरवापर करून केलेल्या दडपशाहीचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, शिंदे यांचा राजकीय जन्मही झाला नव्हता तेव्हा ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मागणीनुसार शिवसेनाप्रमुखांनी ठाण्याला भरभरून दिले. शिंदे आले आणि ठेकेदारांचे राज्य सुरू झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे म्हणजे ठाणे हीच या शहराची ओळख आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

परिस्थिती गंभीर, पोलीस काय करताहेत?

ठाणे शहर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अंमली पदार्थांच्या विक्रीचा अड्डा बनला आहे. कराचीच्या ल्यारी शहराप्रमाणे इथे एक रेहमान डकेत तयार झाला आहे. ठाण्यातील ड्रग्जची तार थेट साताऱ्याच्या दरेगावाजवळ सापडली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भावाच्या दारातच असलेला हा ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला. याचा अर्थ उपमुख्यमंत्र्यांचे कोणी नातेवाईक या ड्रग्जच्या धंद्यात असल्यानेच ठाण्यात त्यांना मोकळे रान आहे काय, असा सवाल राऊत यांनी केला. ठाणे शहरात इतकी गंभीर परिस्थिती असताना पोलीस काय करत आहेत. शहराच्या सुरक्षेकडे लक्ष न देता ते आमचे उमेदवार पकडून घेऊन जातात. इतकेच त्यांचे काम उरले आहे, असे तडाखे संजय राऊत यांनी लगावले

नमो ठाण्याची शिंदेंना लाज वाटली पाहिजे

ठाण्यात भाजपने नमो भारत नमो ठाण्याचे पोस्टर लावले. ठाण्याची नमो अशी ओळख आली कुठून? बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या ठाण्यात नमो ठाण्याचे पोस्टर शिंदेंच्या तोंडावर लावले जातात आणि ते गप्प बसतात. शिंदेंना याची लाज वाटली पाहिजे. त्याच्या या गुलामीला मराठी माणूस मतपेटीतून उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची ठाण्यात सभा

शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच आहे. मराठी माणसांसाठीच ही युती झाली आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची विराट जाहीर सभा होईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिली.