
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. मात्र त्यांच्या राजकारणावरून राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कालपर्यंत राज्यसभेत उपस्थित असणाऱ्या धनखड यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा का दिला यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी, दिल्लीत सप्टेंबर महिन्यात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ”कालपर्यंत सभापती बरे होते. काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणात खर्गे जेव्हा बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांचा माईक अचानक बंद झाला. त्यानंतर भाजपचे सभागृह नेते जे पी नड्डा बोलायला उभे राहिले व त्यांनी सभापती व उपराष्ट्रपतींचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यांनी खर्गेजींना सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही. आम्ही जे बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल. हे संविधानानुसार सभापती पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
पडद्यामागे मोठं राजकारण सुरू
‘पडद्यामागे सध्या मोठं राजकारण सुरू आहे. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्याची ही पडलेली पहिली विकेट आहेत. पहिला बुरुज ढासळला. मला जे संकेत मिळतायत की भाजपचा एक वरिष्ठ नेता जो 75 वर्षांचा होत आहे त्याच्यासाठी हे पद रिकामं करण्याचा प्रयत्न झाला आहे. पंतप्रधान आहेत, राजनाथ सिंह आहेत. हे संविधानिक महत्त्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकामं करावं लावलं. असा माझा अंदाज आहे, असेही संजय राऊत म्हणाले.