कोण कोणाबरोबर आहे हे 10 जूनला कळेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकांचा सगळ्यात जास्त अनुभव आम्हाला असून कोण कोणाबरोबर आहे हे 10 तारखेला कळेल असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल 24 वर्षांनंतर राज्यसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे.

राज्यभेच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, निवडणूक लढायचीच आहे म्हटल्यावर राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण जर त्यांनी निवडणूक लढायचा निर्णय पक्का केला आहे तर महाविकास आघाडी सुद्धा या राज्यात सत्तेवर आहे त्यामुळे आम्हीही तितक्याच मजबुतीने या निवडणुकीत उतरलो आहोत. सहाव्या जागेवरील उमेदवाराचे भवितव्य हे अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. या अपक्ष किंवा इतर पक्षांच्या आमदारांना प्रलोभने आमिषे दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. या आमदारांवर केंद्राच्या अखत्यारीत असलेली जुनी प्रकरणे उकरून काढून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून हा दबाव त्यांच्यावर कसा आणला जातोय त्याची माहिती आमच्याकडे रोज येत आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. काहीही झालं तरी राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकेल, भाजपने उगाच त्यांचे पैसे वाया घालवू नयेत ते त्यांनी एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.