मुख्यमंत्र्यांचे दिल्लीने दारातील पायपुसणे केलंय, संजय राऊत यांची बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांत वरचेवर दिल्ली दौरा करताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरून त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तुम्हाला जेवू का आणि झोपू का हे विचारण्यासाठी दिल्लीला जावं लागतं. अत्यंत फालतू प्रश्नानाठी या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन आदेश घ्यावे लागतात ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच गेले आग्र्याला आणि सगळ्या खानांना धडा शिकवून आले. असे राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, मी बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीने दारातील पायपुसणे केले आहे, अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘मी भाजपचा मांडलिक मुख्यमंत्री आहे, आम्ही भाजपचे गुलाम आहोत आम्हाला दिल्लीत जाऊन आदेश घेऊन यावे लागतात हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही टीका करणार नाही, आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राची इभ्रत दिल्लीच्या चरणी ठेवली आहे.’ पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, पंतप्रधान मुंबई, महाराष्ट्रात फिरत आहे कारण , महाराष्ट्रात भाजप हरते आहे. भाजपने जो जुगाड केला आहे तो हरणार आहे. ही भीती वाटत असल्याने आणि नैराश्यातून पंतप्रधानांचे दौरे सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, ‘या राज्यातील भाजप नेतृत्व नीतीभ्रष्ट अकार्यक्षम असल्याने त्यांना पंतप्रधानांना वारंवार बोलवावे लागत आहे. मणिपूर आणि जम्मू कश्मीर सोडून ते हिंदुस्थानात कुठेही जातात. ते उद्या इस्रायल, गाझालाही जाऊ शकतात कारण ते देशाचे पंतप्रधान आहे. देशात भाजपची हालत गंभीर नाजूक असल्याने पंतप्रधानांना इथे वारंवार यावं लागत आहे. ‘