शिंदे-फडणवीस तातडीने दिल्लीत; मराठा आरक्षण की अपात्रतेची भीती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath shinde devendra fadnavis ajit pawar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज तातडीने दिल्लीला रवाना झाले. या दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेसाठी तो दौरा असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे उद्या शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी असल्याने त्या पार्श्वभूमीवरही शिंदे-फडणवीसांची ही दिल्ली वारी असल्याचेही बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच आज दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यासोबत नव्हते. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून पुन्हा जालनातील आंतरवली सराटी इथे आमरण उपोषणाला सुरुवात केल्याने मिंधे सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस दिल्ली दरबारी पोहोचल्याचे सांगितले जाते.

मराठा आरक्षण हे या दिल्ली दौऱ्यामागचे एक कारण असले तरी उद्या विधानसभा अध्यक्षांकडे होणारी अपात्रता प्रकरणाची सुनावणी हेसुद्धा दुसरे कारण असावे अशी चर्चा आहे. त्यासंदर्भात शिंदे-फडणवीस हे अॅटर्नी जनरल यांची भेट घेऊन सल्ला घेण्यासाठी गेल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते.

मला विचारून गेले नाहीत – अजित पवार
शिंदे आणि फडणवीस यांच्या अचानक दिल्ली भेटीबाबत प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली. अजित पवार हे दिल्ली दौऱ्यामध्ये का नाहीत असेही माध्यमांनी विचारले. त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मला विचारून दिल्लीला गेले नाहीत, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.