
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पैशांच्या जोरावर उमेदवार विकत घेतले जात असल्याचे आरोप होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी 5 कोटी वाटल्याचा आरोप होत आहे. ते पैसे घेऊन पक्षासोबत अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी या बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. या बंडखोरांवर कारवाई होईल, त्यांना जनता मतदान करणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद सादला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोरांवर कारवाई होईल. काही कारवाया झालेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे, यावेळी कोणत्याही शिवसेनेच्या किंवा मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही. लोकांनी ठरवलंय की ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना मतदान करायचं. मतदार गद्दारी करणार नाही. काही बंडखोरांनी स्वत:ला बंडखोर समजून घेतलं असेल तरी ते गद्दार आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अनेकदा निवडणुकीच्या राजकारणात अशा घडामोडी घडतात की, एकापेक्षा जास्त उमेदवार असले आणि तरी त्याच मतदारसंघात एकालाच उमेदवारी मिळते. याचा अर्थ उरलेले चार उमेदवार हे कमी क्षमतेचे आहेत असं होत नाही. पण उमेदवारी एकाला मिळते. पण तुम्ही या संकट काळात पक्षाबरोबर राहायला पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, पोलीस उमेदवारांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेत आहेत आणि थेट एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी पोहोचवत आहेत. हे काम पोलिसांना दिलयं आणि पोलीस आपल्या वर्दीची शान व राखता ते काम इमान ए इतबार करतायत. पोलिसांना चंद्रपूरला, गडचिरोलीला पाठवू अशा धमत्या दिल्या असतील. पण निवडणूक आयोगासमोर हे चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
तुम्ही शिवसेना-मनसेला घाबरलेला आहात. तुमच्या समोर ते लढायला नको आहेत. तुम्ही मशाल-इंजिन असेल याची भीती घेतली आहे. तुम्ही लढा आमच्यासमोर, तुम्ही लढायला काहीच हरकत नाहीए. आम्ही देखील लढायला तयार आहोत. खरं तर तुम्ही आमचं चिन्ह चोरलंय, पक्ष चोरलाय, तरी आम्ही तुमच्याशी लढतोय. एकनाश शिंदेमध्ये हिंमत आणि मर्दानगी उरली असेल तर, ते असे उद्योग करणार नाहीत. पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत. ठाण्यात जे प्रकार घडतात त्यासंदर्भात निवडणूक आयोग काहीही करणार नाही. अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल. त्यामुळे न्यायालयात जाणे हा एकमेव मार्ग आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
या प्रकरणावरून लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. ती चीड तुम्हाला मतपेटीतून दिसेल. तुम्हाला वाटत असेल अशाप्रकारे उमेदवार पळवल्याने मताला 10 हजार, 15 हजार वाटल्याने मुंबई ठाण्यातल्या मतदारांना फरक पडेल तर, तो भ्रम आहे. जे विधानसभा, लोकसभेला झालं ते आता महापालिकेत होणार नाही याची मला खात्री आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? याचं उत्तर द्या
बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनात बसलेली आहे. ते भले काहीही बोलू दे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूष आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत. त्यांना तुम्ही राष्ट्रपुरूषाचा दर्जा दिल्यावर पुतळा का झाकला? तुम्ही गांधींचा, मुंबईत असलेले अटलजींचा पुतळा झाका ना? फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का झाकला, याचं उत्तर कोण देणार? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर, त्यांच्या चोरलेल्या पक्षाच्या नावावर लायकी नसताना मत मागताय मग बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? याचं उत्तर द्या, असे संजय राऊत म्हणाले.



























































