
देशाचे गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी शनिवारी सरकारने दडपशाही करत शिवसेना पदाधिकारी भरत मोर यांच्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड केली. मराठा कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. सरकार डरपोक आहे. सरकार कोणाला घाबरत आहे? असा सवाल करत भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही, असा घणाघात राऊत यांनी केला. ते रविवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
नगरमधील कारवाईबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कश्मीरमधून कलम 370 हटवणारे, मुंबईत शिवसेनेशी दोन हात करू पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने फोडून दाखवणारे, सोनम वांगचुक यांना अटक करणारे निधड्या छातीचे गृहमंत्री नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्याकडे कायदा-सुव्यवस्थेचा विषय आहे. पण तुम्ही येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता, का करत त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये. काळे झेंडे दाखवू नये. शिवसेना पदाधिकारी भरत मोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना अटक करून अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि नंतर नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात नेऊन बसवले. मनसे कार्यकर्ते आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनाही नोटिसा पाठवल्या, काहींना अटक केली. ही कसली भीती वाटत आहे? असा सवाल राऊत यांनी केला.
तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचुकची भीती वाटते, मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावर राज्य करता. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. मग इतके भय वाटण्याचे कारण काय? तुम्ही अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेले नाहीत, ही पण तुमची भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाही किंवा शेतकरी अंगावर येतील अशी भीती तुम्हाला वाटते. अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, लोकशाहीने आम्हाला आंदोलनाचा, मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा, त्यांना जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे. याआधीही अशी आंदोलनं झालेली आहे. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मोरारजी देसाई यांची गाडी अडवलेली होती. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या गाडीसमोर आंदोलन झालेली आहेत. लोकशाहीत हे होत असते. पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशावर राज्य करतेय त्यांना लोकांचे आंदोलन नको आहे. त्यांना लोकांची भीती वाटते. त्यामुळे नगरमधील कारवाईचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
सरकार कोणाला घाबरत आहे?
गृहमंत्री अमित शहा यांच्या नगर दौऱ्या आधी शिवसेना पदाधिकारी भरत मोर यांच्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड केली आहे,
मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि
मनसे कार्यकर्त्यावर नोटीसा बजावल्या
सरकार डरपोक आहे
डरकाळ्या फोडणारे नेते घाबरत असतील तर त्यांनी राज्य करू नये? pic.twitter.com/JGCGDKA3d3— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2025
तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. त्यांनी आंदोलना करणार अशीही घोषणा केलेली नाही. ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि पोलीस येऊन त्यांना अटक करून घेऊन जातात. कुठे घेऊन जातो हे सांगत नाहीत. हा काय प्रकार चालला आहे महाराष्ट्रात? आपण गृहमंत्र्यासारखे निर्भीड वागा. लोकांनी आंदोलन केले, प्रश्न मांडेल तर त्याला सामोरे जा. हा पळपुटेपणा कशाकरत करत आहेत? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्रीही देशाच्या गृहमंत्र्याप्रमाणे वागत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, अटक करणे, तुरुंगात टाकणे याच्यावरच यांचे राज्य चालले आहे. हे फार काळ टाकणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.