हे तर ‘व्हाईट कॉलर क्रिमीनल’, कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करताहेत; संजय राऊत यांची विधानसभा अध्यक्षांवर टीका

महापालिका निवडणुकांसाठी जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन पावत्या दिल्या गेल्या. अशा वेळी त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी विधानसभा अध्यक्ष तिथे येऊन उभे राहिले, असा घणाघात यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. हे सगळे व्हाईट कॉलर क्रिमीनल आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्याचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करताहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी इच्छुक होते. त्याच्याकडून पैसे घेऊन पावत्या दिल्या गेल्या. अशा वेळी कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र, तीच कारवाई होऊ नये म्हणूनच विधानसभा अध्यक्ष तिथे येऊन उभे राहिले. अशा प्रकारे त्यांचे अर्ज रोखले जावे, त्यासाठीच विधानसभा अध्यक्ष तेथे उभे राहून दहशत आणि धमक्यांचं वातावरण निर्माण करत होते हे स्पष्ट दिसतंय. तुम्ही कोणाची बाजू घेताय. गुन्हेगारांची बाजू घेऊ नका. हे सगळे व्हाईट कॉलर क्रिमीनल आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्याचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करताहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात तुमच्या आरओचे वर्तन अयोग्य होतं असं म्हटलं आहे. यावर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला. ROचं वर्तन अयोग्य होतं तर, विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? RO वर विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता. हे अहवालात का आलं नाही. विधानसभा अध्यक्ष्यांनी अशाप्रकारे रांगेत उभे राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे. मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. जे व्हिडीओ समोर आलेत त्यात विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देतात, दबाव आणतायत. पोलिसांना फोन करून राठोड यांची सुरक्षा काढण्याची धमकी देतात. हे सगळं अहवालात का आलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात जसं पार्थ पवार प्रकरणात तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं. पार्थ पवारला कुठे अटक झाली. अटक अधिकाऱ्यांना झाली. तसा इथे आरओचा बळी घेतला जाईल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.