
रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले की तिला जाळले? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनिल परब यांनी अत्यंत गंभीर मुद्दा मांडलेला असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठशाची चौकशी करणाऱ्यांची लायकी नाही त्यांचे नाव घ्यायचे. आमच्या अंगावर आला तर याद राखा, अनिल परब यांच्याकडे असा स्फोटकांचा बराच साठा पडला असून तुम्हाला तोंड दाखवणे मुश्कील होईल, असा इशारा राऊत यांनी दिला. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
ज्यांनी बाळासाहेबांच्या जीवावर आयुष्यभर खाल्ले आणि इमले उभारले, ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्युनंतर विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. मृत्यूनंतर बाळासाहेबांची विटंबना करता आणि त्यांचा फोटो लावता मागे, लाजा वाटत नाही का. नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावे. तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी. सत्ता येते, सत्ता जाते. लोक रस्त्यावर धुतल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या कुटुंबातील घटनेसंदर्भात केलेले भाष्य अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाला की काय झाले अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला आहे. त्याची चौकशी केली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देण्याइतके ते महान नाहीत हे काल उद्धव ठाकरे बोलले. हे नमकहराम नाही तर काय आहेत? ‘मातोश्री’वर भरभरून नमक खाल्ले, पद, प्रतिष्ठा, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करताहेत. यांना नमकहराम नाही तर काय म्हणायचे? हे बेईमान आहेत. यांना याची किंमत मोजावी लागणार. मोदी, शहा, फडणवीस यांना वाचवणार नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांसंदर्भात दळभद्री वक्तव्य केली त्यांना कुणीही माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
नवी मुंबई विमानतळाचे गुजरातीकरण
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर वीज दरामध्ये वाढ करण्यात आली असून या संदर्भात कुणीही बोलत नाही. नवी मुंबईच्या विमानतळाचे उद्घाटन करायला मोदी येत आहेत. पण नवी मुंबई विमानतळाचे पूर्ण गुजरातीकरण झाले आहे. भूमीपुत्र म्हणून दि. बा. पाटील यांचे नाव देणार असले तरी संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही. तुम्हाला गुजराती येते का असे विचारून तिथे नोकऱ्या दिल्या जात आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भविष्यामध्ये शिवसेना, मनसे आणि इतर स्थानिक पक्ष यावर आंदोलन करणार आहेत. शिवसेना शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे, असे राऊत म्हणाले.