
भारतीय जनता पक्ष ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली आहे. त्यामुळे ते राममंदिराचा इव्हेंट करण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत. अयोध्येत राम मंदिर होतंय ही आनंदाचीच बाब आहे. पण, राम मंदिर ही भाजपची जहागिरी नाही, असं टीकास्त्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोडलं आहे.
सोलापूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी सत्ताधारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राम मंदिराचं उद्घाटनाचा इव्हेंट होतोय का, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजप दुसरं काहीही करू शकत नाही. त्या गुढीवर त्यांनी लिहायला हवं की आम्ही अच्छे दिन आणू शकलो नाही. आम्ही लडाखमधून चीनला बाहेर काढू शकलो नाही. आम्ही कश्मीरमधून विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांची घरवापसी करू शकलो नाही. आम्ही बेरोजगारांना रोजगार देऊ शकलो नाही. भाजप हा पक्ष नसून ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. असे प्रयोग ते करत असतात, त्यांना ते करू द्या. महाराष्ट्रात किंवा देशात नवीन वर्षाला गुढ्या तोरणं उभारण्याची परंपरा आहे. भाजपने काही नवीन पंचांग निर्माण केलं आहे का? आम्ही गुढीपाडवा, दसरा सणांना गुढ्या तोरणं उभारतो आणि यापुढेही उभारू. ते भाजपने सांगण्याची गरज नाही. अयोध्येत राम मंदिर होतंय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. उल्हासित करण्याची गोष्ट आहे. पण, राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही. या जगातल्या हिंदूंचंच नव्हे तर सर्वधर्मीयांचं प्रेरणास्थान राहील. जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करताहेत, असं टीकास्त्र राऊत यांनी भाजपवर सोडलं.
महाविकास आघाडी बैठकीवरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये प्रथमच आम्ही देश आणि राज्यस्तरारावरील तीन पक्षांचे प्रमुख नेते बोललो आणि त्यात असं ठरलं की जिल्हा स्तरावर सुद्धा तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पुढे येऊन समन्वय साधण्यासाठी एखादी समिती स्थापन केली पाहिजे. त्याला अजून गती आलेली नाही कारण चार राज्यांच्या निवडणुका होत्या. पण आज अचानक सोलापुरात तो योग जुळून आला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, सोलापूरमध्ये तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आले आणि सोलापूरच्या राजकीय भविष्याविषयी खूप चांगल्याप्रकारे चर्चा झाली. तिघांनी एकत्र राहायचं. लोकसभा, विधानसभा, महापालिका या सगळ्यांतून सध्या जे विष पसरलं आहे या महाराष्ट्रात, ते सोलापुरातून नष्ट करायचं, हे तीन पक्षांनी ठरवलं. आणि हे शुभसंकेत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात हा सोलापूरचा फॉर्म्युला आहे, हा जायला पाहिजे. हे मी परत गेल्यावर सांगणार आहे, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं.
























































