खोके सरकार उलथविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचा अपमान सहन करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा मराठी मातीचा सर्वात मोठा अपमान आहे, अशी टीकेची झोड उठवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी खोके सरकार उलथवून टाकण्यासाठी या विराट मोर्चाच्या माध्यमातून टाकलेले पहिले पाऊल असल्याचे सांगितले. आजच्या लाखोंच्या गर्दीने खरे तर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून डिसमिसच केले आहे. तसेच शिंदे-फडणवीसांचे हे धोकेबाज सरकार फेब्रुवारी महिनाही बघणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी जनता वाट पाहत आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱयांना धडा शिकविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून आजच्या मोर्चातून पहिली ठिणगी पडली आहे. हा रावण गाडण्यासाठी महाराष्ट्रप्रेमी जनता, राज्यातील सर्वच पक्षांचे नेते आज या व्यासपीठावर आल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. आजच्या मोर्चाने सरकार हतबल आणि लटपटायला लागले असून दिल्लीसुद्धा महाराष्ट्राची एकवटलेली ताकद दुर्बिणीतून पाहत असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिली खुर्ची
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे व्यासपीठावर बसले असतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे आगमन झाले हे लक्षात येताच आदित्य ठाकरे हे स्वतः उभे राहत त्यांनी संजय राऊत यांना आपुलकीने गळाभेट देत बसायला खुर्ची दिली. मोठय़ांच्या प्रती दाखवलेल्या या विनयशीलतेचा व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आदित्य ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरकार सत्तेत मदमस्त
प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे. पण त्याकडे या सरकारचे लक्ष नाही. सरकार आपल्या सत्तेत मदमस्त आहे. जनतेची, शेतकऱयांची, कामगारांची त्यांना पर्वा नाही. या सगळय़ांचा राग व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे आणि ज्यांनी अवमानजनक भाषा वापरली त्यांना पायउतार केल्याशिवाय ही जनता थांबणार नाही.
– कपिल पाटील, माजी आमदार, लोकभारती

कोश्यारी आपकी होश्यारी नहीं चलेगी!
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून स्पष्टीकरण देणाऱया राज्यपालांना ‘कोश्यारी आपकी होश्यारी नहीं चलेगी’ हा इशारा देण्यासाठी आज आपण इकडे आलो आहोत. या सरकारला खाली खेचणं हाच महाराष्ट्राच्या विकासाचा एकमेव पर्याय आहे.
– मिलिंद रानडे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

बेताल व्यक्तव्ये करणाऱयांवर दहशतवाद पसरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा!
महापुरुषांबाबत बेताल अथवा धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱया व्यक्तींवर दहशतवाद पसरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा. अशा वक्तव्यांमुळेच दंगली होतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जातात. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. आपण संकल्प करू, ही लढाई अशीच सुरू ठेवू.
– अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

संविधानाची लढाई सुरू
पैशांच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून बसलेल्या ‘ईडी सरकार’ची सत्ता भविष्यात जनता मानणार नाही, असा इशारा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयांतून नागरिक मोर्चाला आले आहेत. आपली संविधानाची लढाई सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह केरळ, तेलंगणामधील राज्यपाल अशाच पद्धतीने वागत आहेत. प्रत्येक राज्यातील भाजप सत्तेला जनतेबाबत आस्था नाही. त्यांना केवळ भांडवलदारांचे भले करायचे आहे. त्याविरोधात आपली लढाई आहे.
– डॉ. उदय नारकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष