
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू ठेवले असून ते ‘ग्रेट गॅम्बलर’ आणि ‘ग्रेट ब्लॅकमेलर’ असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले.
भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्या जुन्या घोटाळ्यांची आठवण करून देत 70 हजार कोटींची प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित असल्याचे विधान केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, थोडक्यात भाजप ब्लॅकमेलच करतो ना? शेवटी तुम्ही ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरूच ठेवले. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांना ब्लॅकमेल करूनच त्यांनी पक्ष फोडले आहेत. तुम्ही सर्वांना ब्लॅकमेल करताय. तुमचा धंदा ब्लॅकमेलचा आहे. तुम्ही ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.
शिंदे किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता, पैसा आणि गुंडगिरीशी
भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या विधानावर भाष्य करताना इतिहासाची पाने उघडायला भाग पाडू नका, असे विधान करून इशारा दिला होता. यावर संजय राऊत यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे. बावनकुळे काय न्यायाधीश झाले आहेत? की तपास अधिकारी? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. बावनकुळे काय बडबडताय, फडणवीस काय बोलतायतं, सावरकर सावरकर… मग बसवा त्यांना समोर आणि द्या त्यांना सावरकरांचे धडे. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता, पैसा आणि गुंडगिरीशी आहे, यांना ना सावरकरांचा विचार, ना राममनोहर लोहिया यांचा विचार, ना अटल बिहारी वाचपेयी यांचा विचार. जोपर्यंत सत्ता तुमच्यासोबत आहे तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहतील आणि मग आमची सत्ता आली की, आमच्या दारासमोर येऊन उभे राहतील सगळे लोक, असेही राऊत म्हणाले.
कायदा सुव्यवस्था वाऱ्यावरती सोडून गृहमंत्री प्रचाराला फिरत आहेत
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरूनही राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्याची झालेली हत्या आणि मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यावर उत्तर भारतीयांनी केलेले हल्ले यांकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारवर टीका केली. ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावरती सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
अजित पवार यांनी भाजपने ‘कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले’ असा जो आरोप केला होता, त्याचा धागा पकडत राऊत यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली. भाजप कुठे-कुठे पैसे खातो हे आम्हाला ठाऊक होते. मात्र कुत्र्यांच्या नसबंदीतील भ्रष्टाचार अजित पवारांनी समोर आणल्याबद्दल त्यांनी पवारांचे आभार मानले. म्हणूनच आता सर्व कुत्रे भाजपवर सुटले आहेत, अशी टिप्पणी करत या भ्रष्टाचाराची माहिती आपण मनेका गांधी यांना कळवणार असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

































































