मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणणं हा महाराष्ट्राचा व आंदोलन करणाऱ्या जनतेचा अपमान – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या लढ्याला रुदाली म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ”मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणणं हा महाराष्ट्राचा व आंदोलन करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

”देवेंद्र फडणवीसांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हटलं आहे. भाजपचा नेता या आंदोलनाची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करतो. राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतात. मराठीच्या आंदोलनासाठी रुदाली शब्दाचा वापर करणं हा महाराष्ट्राचा व जी जनता आंदोलन करतेय त्यांचा अपमान आहे. एका संघर्षाला तुम्ही रुदाली कसं म्हणू शकता? उद्या तुम्ही म्हणाल की स्वातंत्र्य लढा रुदाली आहे, आणिबाणीच्या वेळी जी आंदोलनं झाली ते रुदाली आहे. अयोध्यात जे आंदोलन झालं ते देखील रुदाली आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं ते देखील रुदाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईला पण हे लोकं रुदाली म्हणतील. ऑपरेशन सिंदूर देखील रुदाली आहे का? त्यावरून जी मतं मागत आहात ते देखील रुदाली आहे? पण मला फडणवीसांना सांगायचं आहे की रडगाणं वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते. 1857 चं बंड त्यातूनच झालं. 1978 साली जो सत्तापालट झाला तो अशाच प्रकारच्या रुदालीतून झाला आहे. याचा अभ्यास फडणवीसांनी करणं गरजेचं आहे. त्यांचा इतिहास व राजकीय ज्ञान कच्च होत चाललं आहे, त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही देऊ”, असे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांना सुनावले आहे.

”पाच तारखेला जो आवाज मराठीचा हा विजयोत्सव झाला. त्या विजयाचा हँगओव्हर उतरलेला नाहीए. आपण जर त्यासंदर्भात लोकांच्या प्रतिक्रीया पाहाल. तर लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता गेली वीस वर्ष वाट पाहत होतील. त्यामुळे उद्दव ठाकरे व राज ठाकरेंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र योग्यवेळी योग्य गोष्टी घडत असतात. भाजप व मिंधे गटाचे नेते म्हणत आहेत की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं शक्यच नाही. हे आव्हान परप्रांतियांकडून नाहीय. आमची भिती आणि आम्हाला आव्हान या महाराष्ट्रातल्या अंतर्गत शक्तींकडून आहे. हे म्हणताता की राज ठाकरे व उद्धव ठाकरे कसे एकत्र येतात ते पाहतो. तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करायचा प्रयत्न करताय का? दबाव आणू पाहताय का? मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्याने तर या आंदोलनाची पहलगाम हल्ल्यासोबत तुलना केली. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत व संयमी भाष्य केलं पाहिजे. पहलगाम हल्ल्याच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे चित्र हे सांगतंय की सरकार व सरकारच्या माणसांनाी उद्धव व राज एकत्र आलेले नकोय. त्यांना मराठीचा वैभव व गौरव व्हावा असं वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना ते अतिरेक्यांशी करतायत, असे संजय राऊत म्हणाले.

”शिवसेना व मनसे बद्दल राजकीय निर्णय लवकरच केला जाईल. उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेना असेल आमच्याकडून सातत्याने मराठीसाठी व महाराष्ट्रासाठी केलेला हात कायम पुढे आहे. मराठी माणसाच्या मनातील ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे. त्याला वाट करून द्यायचं काम देखील आम्ही करतो. जो आदर शिवसेना व ठाकरे कुटुंबियांविषयी आहे. मराठी माणसाच्या एकजूटीविषयी जी आमची भूमिका आहे तिच राज ठाकरे व मनसे नेत्यांच्या मनात आहे. दोन्ही कडच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये याच भावना आहेत. दोन्ही कडचे नेते, कार्यकर्ते एकत्र येतायत, आंदोलन करतायत, आनंद साजरा करतायत, त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणी करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

नरेंद्र जाधव समिती विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या दृष्टीने हा विषय आता मार्गी लागला आहे. समिती वगैरेला काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेले आहे की या विषयीची कोणतीही समिती, अहवाल आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे या समित्या निरर्थक आहेत. सरकार कोणतेही असो, असा कोणताही अहवाल सरकारला स्वीकारता येणार नाही. नरेंद्र जाधव हे मराठी भाषिक विद्वान आहेत. त्यांना देखील मराठीबाबत संवेदना असणारच ना.