मिस्टर फडणवीस, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्याला मराठीप्रेमींची तुफान गर्दी झाली होती. या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुखावला असला तरी सत्ताधारी भाजप व महायुतीच्या नेत्यांचा थयथयाट सुरू आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विजयी मेळाव्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. ”ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आता तुमची रुदाली सुरू झाली आहे. आता तुम्ही आणि एकनाथ शिंदे रडण्याचे कार्यक्रम आयोजित करा’, असा जोरदार टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

”महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडके बटाटे आहेत. कालच्या मेळाव्यानंतर दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालेनासं झालं आहे. ठाकरेंना काय बोलावं ते सांगावं लागत नाही. लेखणी आणि वाणीच्या कुंचल्याच्या माध्यमातून ठाकरेंनी आपलं वर्चस्व महाराष्ट्रावर निर्माण केलं. मिस्टर फडणवीस, पब्लिक सब जानती है म्हणूनच काल लाखोंच्या संख्येने लोकं आले होते. पब्लिकला तुम्ही किती खोटारडे आहात हे देखील माहित आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुम्ही सैरभैर झाला आहात. तुम्ही घाबरले आहात. मिस्टर फडणवीस, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू झाली आहे. तुम्ही आणि एकनाथ शिंदे असे दोघांनी एकत्र रडण्याचा कार्यक्रम सुरू करा. कधी फडणवीस गातील, शिंदे तबला वाजवतील… तुणतुणे वाजवायला आहेतच तिसरे डेप्युटी सीएम”, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.