हे सरकार बहुमत गमावून अंतर्कलहाने पडेल- संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे सरकार मजबूत पायावर उभं नव्हतं आणि राहणारही नाही. 11 दिवसात हे सरकार पडेल अशा तारखा आम्ही लाऊडस्पीकर वरून देणार नाही. मात्र हे सरकार बहुमत गमावेल आणि अंतर्कलहाने पडेल. असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. रविवारी ते पत्रकारांच्या प्रश्नांना ऊत्तर देत होते.

कोणाला कितीही पिपाण्या, सनई -चौघडे वाजवायचे आहेत ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज आहे. आणि तो महाराष्ट्रभर घुमत राहील. शिवसेनेचा लाऊडस्पीकर गेली 56 वर्षे सुरु आहे. आणि हा लाऊडस्पीकरचा आवाज ऐकण्यासाठी 56 वर्षे महाराष्ट्र जिद्दीने शिवसेनेच्या मागे उभा आहे. म्हणूनच भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे. असे राऊत म्हणाले.

यावेळी राऊत म्हणाले की तुम्ही आधी सरकार स्थापन करा. मागील महिन्यापासून तुम्ही हम दोनो एक दुजे के लिये या चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये अडकून पडलेला आहात. किती वेळा दिल्लीला जाल. आम्ही शिवसेने सोबत आहोत असं ते म्हणत असले तरी ती शिवसेना नाही. शिवसेना काल तुम्हाला वैजापूर, पैठणला दिसली असेल. ती शिवसेना कष्टकऱ्यांची आणि स्वाभिमानाची आहे.

आदित्य ठाकरे यांना शिवसंवाद यात्रे दरम्यान मिळणारा प्रतिसाद पाहता ‘उदंड प्रतिसाद’ हा शब्द देखील अपुरा पडेल. काल पैठण येथे आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेली तरुणाई पाहता पैठणचा नाथ सागरच जणू गर्दीच्या रूपात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. ते चित्र ज्यांनी चोऱ्या माऱ्या करून सत्ता स्थापन केली त्यांच्या छातीत धडकी भरवणारे आहे. आजही अनेक जुन्या शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. त्या अश्रूंच्या महापुरातच हे डबल स्टॅंडर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. असे राऊत म्हणाले.

भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. सध्या संपूर्ण देशावर ही परिस्थिती आहे. यासाठीच मी चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं. त्यांच्या पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं. मात्र नंतर खुलासा करावा लागला ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याभावनेचा आदर व्हायला हवा.

गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरु आहे. तो कुणी उतरवायची आणि बंद करण्याची हिम्मत करू शकले नाहीत. हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. तुमच्या पीपाण्या लोकांनी बंद केल्या. आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही निर्भीडपणे आणि बेडरपणे बोलतो. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची भूमिका मांडत राहील. परिणामांची आम्हाला पर्वा नाही. सकाळी नऊच काय 24 तास आम्ही बोलत राहू आणि फिरत राहू. आम्ही इथे आहोत तर आदित्य ठाकरे राज्यात फिरत आहेत. त्यांचा आवाजही महाराष्ट्राला हवाहवासा वाटतो. उद्धव ठाकरे देखील लवकरच दौऱ्यासाठी बाहेर पडतील. प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातील महिलेचा हुंदका हा सुद्धा लाऊडस्पीकर आहे. हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावा. तुमची सगळी कारस्थानं मला माहित आहेत. मी याला सामोरं जायला तयार आहे. असे राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना ठणकावून सांगितले.

माणूस किती खोटं बोलू शकतो. असत्याला सत्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असतं. त्यामुळे या भंपक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आज लाखो करोडो मराठी माणसं या महाराष्ट्रात अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका. असे राऊत म्हणाले.