गद्दार आणि हुकूमशाहांना कायमचे गाडणार; संजय राऊत यांचा घणाघात

हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री मदतीला दिल्लीत धावून गेला. सध्या देशावर हुकूमशाहीचं मोठं संकट असून या हुकूमशांची कबर खोदण्यासाठीच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौरा केला. त्यांचे जंगी स्वागत झाले. या दौऱ्यामुळे हुकूमशहाच्या पायाखालची वाळू घसरली असून महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गद्दार आणि हुकूमशहांना या कबरीमध्ये कायमचे गाडू, असा इशाराच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला. दिल्लीला फेस आणणारे उद्धव ठाकरे हाच आमचा ‘फेस’ आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मिंधे दिल्लीत जातात तेव्हा मोदी त्यांना भेट तरी देतात का? त्यांच्या गार्डनमध्ये बसवून ठेवतात. आणि मग पांढऱ्या पॅण्टवर गवत लावून ते परत मागे येतात.  त्यामुळे दिल्ली काय आहे हे आम्हाला शिकवू नका. तुमच्या पोराबाळांची लायकी नसतानाही उद्धवजींनी त्यांना दिल्लीत पाठवलं हे विसरू नका असे संजय राऊत यांनी ठणकावले. भगवा सप्ताह आजच्या ऐवजी काल व्हायला हवा होता असे सांगून खासदार राऊत म्हणाले, काल नागपंचमी होती. ज्या सापांना आपण वर्षानुवर्ष दुध पाजलं त्यांचे फणे ठेचण्यासाठी कालचा दिवस चांगला होता. विधानसभा निवडणुकीत या सापांचे फणे ठेचल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही  शेख हसीना यांना बांगलादेशातील जनतेने जसे पळून लावले तसे महाराष्ट्रातील जनता येत्या विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना पळून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पानीपत युद्धात स्वर्गवासी झालेल्या सदाशिवराव भाऊ यांचा एक तोतया पुण्यात अवतरला आणि मीच सदाशिवराव भाऊ असे सांगायला लागला. या तोतयाचे नाव सुखलाल आणि तो गुजरातचा होता आणि त्याचा जो साथीदार होता त्याचं नाव गंगोजी शिंदे. हे असे बनावट लोक निर्माण करून महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा हे कटकारस्थान इतिहासापासून सुरू आहे. असे तोतये आमच्या अंगावर सोडाल तर त्यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणारच असे राऊत यांनी सांगितले.

आता नमक हराम – 2 सिनेमा काढणार

सध्या ठाण्यात काही लोक सिनेमा काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की प्रोड्युसर असा सवाल खासदार राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले, मलाही एक चित्रपट काढायचा आहे त्याचं नाव आहे नमक हराम -2. या चित्रपटाचं स्क्रिप्ट मी स्वत: लिहिणार आहे. पहिला नमकहराम अमिताभचा होता. पण नमक हराम-2 मध्ये मी ठाण्यातील सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे.  असेही संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्राला ‘नमक हराम 2’ ची उत्सुकता आहे. समोर दिसतो आहे, पण तो जगाला दाखवायचा आहे. यांना नागांची उपमा देऊन मी नागांचा अपमान करणार नाही. हे गांडूळही नाही, मोदींसमोर वळवळणारे, सरपटणारे दुतोंडी मांडूळ आहे. यांना फणाच नाही. रोज लोटांगण घालतात. तिकडे गेल्यावर पँट खराब होत नाही, दिल्लीतून फोन येतो तेव्हाच यांची पँट खराब होते. फोन येताच पळतात. तरी नशीब पँट घातलेली असते!

ठाण्यात भगवा फडकवणारच –  राजन विचारे

सत्तेचा गैरवापर करून मिंध्यांनी ठाण्यात लोकसभेची निवडणूक जिंकली. या संपूर्ण गैर व्यवहाराचे पुरावेच आम्ही कलेक्टरला दिले आहेत. न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या भाषणात दिला. ते म्हणाले की , शिवसेनेला आव्हान देणारे अजून कोणी पैदा झालेले नाही. ठाण्याच्या गड सध्या त्यांनी आपल्या ताब्यात घेतला असला तरी येत्या विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय ठाणेकर स्वस्त बसणार नाहीत असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.