
काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडी संदर्भात उलट-सुलट बातम्या येत होत्या. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. यादरम्यान संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘आम्ही सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर तडजोड करणार नाही’.
संजय राऊत यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ‘सावरकरांनी अंदमान तुरुंगात 10 वर्षांहून अधिक काळ घालवला. ज्यांनी तुरुंगाचा अनुभव घेतला आहे तेच ते जाणू शकतात. ते सावरकर असोत की नेहरू, नेताजी सुभाष बोस किंवा कोणीही, काळाच्या मागे जाऊन इतिहासाचे विकृतीकरण बरोबर नाही.’
हिंदुत्वाची विचारधारा आणि सावरकरांबाबत आपला पक्ष नेहमीच काँग्रेसपेक्षा वेगळा राहील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले, ‘आम्ही राहुल गांधींबद्दल काहीही चर्चा करणार नाही. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. पण युती तडजोडीवर चालते. युती नेहमीच तडजोडीची असते.’
त्यांनी ठामपणे सांगितले, ‘आम्हाला आघाडी टिकवायची आहे. आम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलत राहतो. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर सहमत असू शकत नाही. पण हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर आम्ही तडजोड करणार नाही.’
संजय राऊत एनडीटीव्हीला म्हणाले, ‘मी झुकलो असतो, तर पक्ष फुटला असता, आमची कोणाबद्दल तक्रार नाही. जामीन रद्द करण्यासाठी ते उच्च न्यायालयात गेले. मी तुमचा ऋणी आहे, असे न्यायाधीशांना म्हटल्यावर ते म्हणाले की, गुणवत्तेवर निकाल दिला आहे.’
दरम्यान यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनाच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
























































