
आयपीएलचा 19 वा हंगाम उद्यापासून सुरू होत असताना महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे हिंदुस्थानचे दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार आहेत. पण यंदा सर्वांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे ते धोनी युगाचा शेवट जवळ आला आहे का? संजू सॅमसनची सीएसकेमधील एण्ट्री त्याचेच संकेत असल्याचे बोलले जातेय. यात किती तथ्य आहे ते लवकरच समोर येईलच.
हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरू शकतो, अशी गेली चार वर्षे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती, पण तसे झाले नाही. मात्र यंदा परिस्थिती वेगळी दिसतेय. चेन्नई सुपर किंग्जमध्ये संजू सॅमसनचा समावेश हा भविष्यातील नेतृत्व बदलाचे संकेत दिल्याचे माजी कसोटीपटू इरफान पठाणने मत व्यक्त केलेय. सॅमसन हा संघाचा पुढचा चेहरा बनू शकतो. धोनी त्याच्याकडे सूत्रे सोपवू शकतो, असे तो म्हणाला.
‘पूर्वीसारखा शेवटच्या षटकांत सामना संपवणारा धोनी आता सातत्य राखू शकत नाही. वय आणि दुखापतीमुळे तो फक्त शेवटच्या दोन षटकांत येतो, पण ते पुरेसे ठरत नाही,’ असे तो म्हणाला. संदीप शर्माविरुद्ध अपूर्ण राहिलेला सामना याचे उदाहरण देत त्याने वास्तव मांडले. ‘धोनीसारख्या खेळाडूने फक्त शेवटचा धमाका देणारा खेळाडू न राहता किमान 4-5 षटके खेळून जबाबदारी घ्यायला हवी,’ असेही पठाणने सांगितले.
























































