
सामना प्रतिनिधी । अकलूज
टाळ, मृदुंगाच्या साथीत विठु नामाचा जयघोष करीत बुधवारी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा ३३३ वा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता झाला. लाखो वैष्णव भाविक-भक्तांचा मेळा रिंगण सोहळ्यानंतर अकलूज मुक्कामी विसावला.
फोटो : तुकाराम महाराजांच्या पालखीचे भव्य रिंगण
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक विरेश प्रभु, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, प्रांताधीकारी शमा पवार, तहसिलदार बाई माने, पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पुणे प्रशासनाच्या वतीने सोहळ्याला निरोप देण्यात आला. नगारखाना, अश्व व पादुकांचे पुजन करण्यात आले. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मांझा, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
तत्पुर्वी पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव सराटी येथे नीरा नदीपात्रात पादुकांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. ग्रीन कार्पेवर अंथरलेल्या फुलांच्या पायघङ्यांवरुन सकाळी ७ वा. १० मिनिटांनी स्नानासाठी पादुका नदीवर आणण्यात आल्या. आरती झाल्यानंतर पालखी सोहळा अकलूजकडे मार्गस्थ झाला. शहरातील गांधी चौक येथे ९ वा. ३७ मिनिटांनी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार हनुमंत डोळस यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. अकलूजकरांचे स्वागत स्विकारून तुकाराम महाराजाचा रथ नगारखान्यासह सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळ्यासाठी आणण्यात आला. यावेळी रथाचे सारथ्य सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
सदाशिवराव माने विद्यालयात मानाच्या अश्वांचे पुजन खा. विजयसिंह मोहिते-पाटील, पालखीचे पुजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. प्रथम पताकाधारी, तुळशी वृंदावनधारी महिला, विणेकरी, टाळकरी, मृदुंगवाले यांनी रिंगण पूर्ण केले. त्यानंतर बाभुळगावकरांचा देवाचा अश्व तर स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा स्वाराचा अश्व रिंगणासाठी सज्ज झाले. अश्वांनी तीन प्रदक्षीणा मारत रिंगण पुर्ण केले. अश्व दौडताच हजारो भाविक भक्तांनी विठू नामाचा जयजयकार केला.


























































