मला मकोकातून बाहेर काढा! वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सबळ पुरावे असल्यामुळे आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला, तर दुसरा अर्ज वाल्मीक कराड याने केला असून मकोकातून आपल्याला बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी त्याने केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात  दुसरे सत्र न्या. व्ही.एच. पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी वाल्मीक कराडच्या वतीने अॅड. विकास खाडे आणि अॅड. मोहन यादव यांनी दोषमुक्तीचा अर्ज केला. सरकारी पक्षाला अजून डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आपल्या अशिलाला मकोकाच्या आरोपातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी या वकिलांनी केली. त्यावर सरकार पक्षाच्या वतीने सर्व प्रकारचे डिजिटल तसेच इलेक्ट्रॉनिक्स पुरावे सीलबंद पद्धतीने न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या विषयावर जवळपास तासभर उभय पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्या. व्ही.एच. पाटवदकर यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी 17 जून रोजी घेण्यात येईल, असे जाहीर केले. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी तसेच इतर काही अर्ज तपास यंत्रणांकडून करण्यात आले आहेत. या सर्वांवरही एकत्रित सुनावणी होणार असल्याचे न्या. व्ही.एच. पाटवदकर यांनी स्पष्ट केले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाकडे भक्कम पुरावे असून आता आरोप निश्चित करण्यात यावेत, अशी विनंती करणारा अर्ज सादर केला.