
सततच्या सरावामुळे या कलेत तो इतका पारंगत झालाय की पेपरपासून कोणतीही वस्तू तो हुबेहुब साकारू शकतो. मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्धिकी अशा काही कलाकारांचे पेपर कॅरिकेचरदेखील त्याने तयार केले आहे. नुकतीच त्याने पुठ्ठा आणि पेपरपासून लहान आकाराची हुबेहुब बुलेट तयार केली आहे. त्यासाठी त्याला एक महिन्यांचा कालावधी लागला आहे. या बुलेटचे सगळे पार्ट वेगळे करून ते पुन्हा जोडता येऊ शकतात.
घरातील रद्दी पेपर किंवा प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटल्स आपण भंगारवाल्याला देतो किंवा कचऱयात टाकतो. परंतु या वस्तू फेकून न देता माहीमला राहणाऱया सर्वेश कीर या तरुणाने त्याचं सुंदर कलाकृतीत रूपांतर केलं आहे. आकाशकंदिल, वेगवेगळ्या कंपन्यांचे लोगो, संगीत वाद्य, बाईक्स, कार, रॉकेट अशा शंभरहून अधिक भन्नाट कलाकृती त्याने तयार केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठी त्याने कसलेही प्रशिक्षण घेतलेले नाही.
वरळीच्या रहेजा कॉलेजमध्ये अप्लाईड आर्ट्सच्या दुसऱया वर्षात सर्वेश शिकतोय. गेल्या अकरा वर्षांपासून तो रद्दी पेपर, कार्डबोर्ड आणि प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून विविध कलाकृती तयार करतोय. याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना सर्वेश म्हणाला, टीव्हीवरील मॅड आणि आर्ट अटॅक या शोमुळे मी प्रभावित झालो. अभ्यासातून रिकामा वेळ मिळाला की पेपरपासून विविध वस्तू तयार करायचो.
सुरुवातीला मी टुथपेस्टच्या रिकाम्या बॉक्सपासून ट्रक आणि हेलिकॉप्टर तयार केले. लोकांकडून माझ्या कलेचं कौतुक होऊ लागल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढत गेला. वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचे प्रयोग करू लागलो. पीओपीच्या तुलनेत पेपरपासून तयार केलेल्या वस्तू वजनाने हलक्या असतात. त्यामुळे दक्षिण मुंबईतील काही मूर्तीकार सर्वेशकडून बाप्पाच्या मूर्तीसाठी लागणारे डेकोरेशन, हातातील शस्त्रs, संगीत वाद्ये तयार करून घेतात.
पेपर आर्टमध्ये मी स्वतःची वेगळी शैली तयार केली आहे. इन्स्टाग्रामवरील माझ्या कलाकृतींचे फोटो पाहून लोक कौतुक करतात, ऑर्डर देतात. यातून मिळणाऱया पैशांतून माझा पॉकेटमनी सुटतो. भविष्यात जाहिरातीच्या क्षेत्रात करियर करायचं, त्यासोबतच पेपर आर्टमध्ये स्वतःचं वेगळं काहीतरी सुरू करायचा माझा विचार आहे.
– सर्वेश कीर, पेपर आर्टिस्ट
























































