साताऱ्याच्या पश्चिम भागात तुफान पाऊस सुरूच, अंबेनळी घाट बंद, पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून, ओसंडून वाहणाऱ्या वेण्णा नदीवरील जावलीतील पुनवडी येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोयनाच्या पाणीसाठय़ात 24 तासांत 4.08 टीएमसीने वाढ झाली असून, पाणीसाठा 44.71 टीएमसीवर गेला आहे. नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनाने नद्याकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, सातारा, कराड, वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्या तुलनेत कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा तालुक्यांत कमी पाऊस आहे. दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला असून, पश्चिम भागात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत चालला असला, तरी अतिवृष्टीचेच संकट निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे.

जाकली तालुक्यातील केळघर परिसरात अतिवृष्टीमुळे नांदगणे ते पुनवडी दरम्यानच्या वेण्णा नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे.

कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता गुरुवारी सायंकाळी पायथा वीजगृहातील विसर्ग प्रतिसेकंद 2100 क्यूसेकपर्यंत वाढवला आहे. धरणातील पाण्याची आवक सध्या प्रतिसेकंद 48 हजार 427 क्युसेक असून, मागील चोवीस तासांत पाणीसाठय़ात 4.08 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणीउंचीत 6 फूट 2 इंचांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 44.71 टीएमसी झाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात व कंसात आजअखेर झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे ः कोयना 112 (1675), नवजा 121 (2121), महाबळेश्वर 270 (2174). धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 60.54 टीएमसी पाण्याची गरज आहे.