
‘स्वच्छ आणि निर्मळ तालुका’ म्हणून सातारा जिल्ह्यात जावळीची ओळख आहे. ऐतिहासिक दुर्गम, डोंगराळ आणि ‘शूर-वीरांचा तालुका’ अशी बिरुदावली मिरविणाऱया जावळी तालुक्यातील गावागावाला जोडणारे, प्रमुख राज्यमार्गांसह जिल्हा मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे.
80 टक्के रस्त्यांची खड्डय़ांनी चाळण झाली असून, वाहनचालकांची कसरत सुरू आहे. रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. खड्डय़ांमुळे पाठदुखीचे रुग्ण वाढले आहेत.
जावळीत एखाद्या वर्षी पाऊस अधिक पडो किंवा पावसाचे प्रमाण कमी असो, रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या वाढलेलीच दिसते. हे वर्षही त्याला अपवाद नाही. काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे रस्ते वगळता, तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पाचवड ते पाचगणी, मेढा ते पाचवड मार्गावर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
कुडाळ-पाचवड, मेढा-कुडाळ, सर्जापूर-कुडाळ, करंदी-आखाडे यांसह मेढा पश्चिम भागातील जवळजवळ सगळेच गाव आणि खेडय़ांना जोडणाऱया रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जावळीतील सर्व घाटरस्तेही खराब झाले आहेत.
रस्ताकामात वापरली जाणारी खडी, डांबर याचा दर्जा ‘क्वॉलिटी कंट्रोल’मार्फत तपासला जातो. मात्र, हे काम गांभीर्याने होत नसल्यानेच रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत.






























































