सातारा – नोकरीच्या आमिषाने 11 लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोग्य व वन विभागात वनरक्षकाची सरकारी नोकरी लावतो, असे आमिष दाखवून साताऱयातील तिघांची व मुंबईतील दोघांची एकूण 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश नंदकुमार शिंदे (रा. बोरगाव, ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

वनरक्षक, वनपाल, आरोग्य विभागात नोकरी लावतो, असा विश्वास संशयित राजेश शिंदे याने दाखवला. या विश्वासाला बळी पडून गणेश कृष्णा चव्हाण (वय 29, रा. सदरबझार, सातारा) याने याची माहिती त्याच्या मित्रांना दिली. गणेशचे मित्र निखिल श्रीरंग निकम (रा. सदर बझार, सातारा), सचिन दगडू कदम (रा. घाटकोपर, मुंबई), सागर संतोष उत्तेकर (रा. कांदिवली, मुंबई), किरण प्रकाश शिंदे (रा. गडकर आळी, सातारा) यांना दिली.

या सर्वांकडून राजेश याने गत वर्षभरात ऑनलाइन पद्धतीने 11 लाख रुपये घेतले. पैसे पोहोच झाल्यानंतर लवकर अपॉइंटमेंट लेटर मिळेल. नोकरी पक्की होईल, असे संशयित सांगत होता. मात्र, आठवडा, पंधरा दिवस, महिना उलटून गेला तरी हालचाल होत नव्हती. बराच कालावधी चालल्यानंतर तक्रारदारांनी पैसे माघारी द्या किंवा नोकरी तरी द्या, असा तगादा लावला. यातून संशयित राजेश याने फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश याने सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेशविरुद्ध तक्रार दिली.