
सांगली जिह्यात पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवीत गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 19 जणांवर, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या 17 जणांवर, चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 43 जणांवर, तडीपार केले असतानाही हद्दीत फिरणाऱ्या पाचजणांवर, तसेच अन्य कलमांअंतर्गत तब्बल 264 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी 77 पोलीस अधिकारी आणि 491 पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते.
सांगली जिह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मध्यरात्री जिह्यातील विविध ठिकाणी ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान अभिलेखावरील गुन्हे करणारे आरोपी चेक करणे, शस्त्र्ा अधिनियम, अमली पदार्थविरोधी कायदा, दारूबंदी, चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणारे, तसेच हद्दपार मिळून आले तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेकायदेशीर घातक शस्त्र्ाs बाळगणाऱ्या 19 जणांवर ‘आर्म ऍक्ट’प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. अमली पदार्थ बाळगून, तसेच ओढणाऱ्या 17 जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले. चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 43 जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. स्वतःजवळ बाळगलेल्या मालमत्तेविषयी समाधानकारक माहिती न देणाऱ्या दोघांवर कारवाई केली. जिह्यातून हद्दपार केले असतानाही फिरणाऱ्या पाचजणांवर कारवाई करण्यात आली. अवैध दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, ‘ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह’प्रकरणी अशा एकूण 178 जणांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत जिह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी-कर्मचारी यांसह एकूण 77 पोलीस अधिकारी आणि 491 पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदविला होता.