
पुणे महसूल विभागातील रेशन दुकानांमध्ये झालेल्या अत्याधुनिक बदलाने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळालेल्या सातारा तालुक्यातील रेशन दुकानांचा कायापालट झाला आहे. भविष्यात देशातील सर्व रेशन दुकानांसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविणार, अशा शब्दांत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय (दिल्ली) येथील केंद्रीय उपसचिक सरोजिनी रावत यांनी गौरवोद्गार काढले.
देशात पुणे विभागाने रेशन दुकाने ‘आयएसओ’ करण्याचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय (दिल्ली) येथील केंद्रीय उपसचिव सरोजिनी रावत यांनी सातारा तालुक्यातील ‘आयएसओ 9001’ मानांकन प्राप्त रास्त भाव दुकानांना भेटी दिल्या. रेशन दुकानदारांनी अत्याधुनिक पद्धतीने रेशन दुकाने कशी सुरू ठेवली आहेत, याची त्यांनी निसराळे, खोडद, करंजे तर्फ सातारा, यादोगोपाळ पेठ (सातारा) आदी ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी प्र-सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, सातारा तहसीलदार राजेश जाधक, नायब तहसीलदार सुनील शेट्टी, पुरवठा निरीक्षक संतोष दळवी, रेशन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष संजय रजपूत उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील रेशन दुकानांमधील अत्याधुनिक बदल पाहून सरोजिनी रावत यांनी कौतुक केले. भविष्यात रेशन दुकानांना ‘पीएम वाणी योजने’अंतर्गत काय-फायद्वारे कमी दरात डेटा मिळणार आहे. तसेच सीएससी सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला घरपोच रेशन कार्ड, जातीचा दाखला, सात-बारा, खातेउतारा, प्रॉपर्टी कार्ड व इतर आवश्यक दाखले व बँक विमा व इतर सेवा मिळणार आहेत. पूर्वीचे रेशन दुकान व आधुनिक रेशन दुकान यामध्ये मोठा बदल झाला असून, ‘सातारा पॅटर्न’ देशात राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचेही केंद्रीय उपसचिव सरोजिनी रावत यांनी सांगितले.


























































