
सामना प्रतिनिधी । मुंबई
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे प्रतिष्ठsचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गेल्या आठवडय़ात वादाचे नाटय़ रंगले. नाटय़ परिषदेचे सरकार्यवाह सतीश लोटके यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेवरच आक्षेप घेतला. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नाटय़वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या. या पार्श्वभूमीवर लोटके यांनी एकाएकी यू टर्न घेत मंगळवारी दिलगिरीचे पत्र अध्यक्षांना पाठवले. आधी नाराजीचे नाटय़ करणाऱया लोटकेंचे ‘सोयरे सकळ’ कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आठवडाभरानंतर दिलगिरी व्यक्त करणाऱया लोटकेंना नेमका कोणाच्या ‘बाभळी’चा काटा रुतला, अशी चर्चाही नाटय़वर्तुळात रंगली आहे.
5 जूनचे पत्र
31 मे रोजीच्या कार्यकारी समिती सभेत आपण जाहीर केलेल्या निवड प्रक्रियेनुसार पुरस्कार दिले गेले नाहीत ही बाब योग्य नाही व शाखांवर अन्याय करणारी आहे. 14 जून रोजी देण्यात येणार पुरस्कार निवडप्रक्रिया सदोष असून सर्वसाधारण सभा आणि नियामक मंडळ सभेत या उपक्रमाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा दोन्ही सभांनी याबाबत निर्णय दिलेला नाही. पुरस्कार प्रक्रियाच रद्द करावी.
11 जून रोजीचे पत्र
मी अध्यक्षांसह नियामक मंडळालाही पत्र पाठवले होते. 60 सदस्यांना पाठवलेले पत्र हे नाटय़ परिषदेच्या अंतर्गत होते. ते व्हायरल झाले, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. पुरस्काराचे स्वरूप बदलण्याबाबत मी विनंती केली आहे. पुरस्कारार्थीच्या नावास माझा विरोध नव्हता व नाही याची नोंद घ्यावी. पुरस्कार प्रक्रियेबाबत बदल व्हावेत ही अपेक्षा होती
– हीच पुरस्कार निवड प्रक्रिया गेल्या वर्षीही राबविण्यात आली होती. गेल्या वर्षीही लोटके हे पदाधिकारी होते, मग त्यांनी प्रकियेवर आताच आक्षेप का घेतला, असा सवालही काही पदाधिकाऱयांनी उपस्थित केला आहे.
– नाटय़ परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळय़ाला अवघे दोन दिवस असताना लोटकेंना दिलगिरी व्यक्त करण्यासाठी कोणी दबाब टाकला, याची चर्चाही दुसऱया बाजूने रंगली आहे.



























































