
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने सिंगापूर ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत विद्यमान जगज्जेत्या कोरियन जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत हिंदुस्थानी जोडीने किम वोन हो आणि सिओ स्युंग जे या बलाढ्य जोडीवर २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला.
सात्विक-चिराग या चतुर्थ मानांकित हिंदुस्थानी जोडीचा कोरियन जोडीविरुद्ध तीन लढतींमधील हा पहिलाच विजय ठरला. तब्बल ५२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सात्विक चिराग यांनी दबावाखालीही संयम राखत विजय खेचून आणला आणि यंदाच्या हंगामातील दुसऱ्या वर्ल्ड टूर अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी थायलंड ओपनमध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
उपांत्य सामन्यात पहिल्या गेममध्ये हिंदुस्थानी जोडी ८-१३ आणि नंतर १३-१७अशी पिछाडीवर होती. मात्र, त्यांनी अप्रतिम पुनरागमन करत सलग गुणांची कमाई केली आणि गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्येही सात्विक-चिराग ११-१४ असे मागे पडले होते. पण त्यानंतर त्यांनी सलग सहा गुण मिळवत १७-१४ अशी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.
दरम्यान, मिश्र दुहेरीत हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या हिंदुस्थानी जोडीला उपांत्य फेरीत जपानच्या युईची शिमोगामी आणि सायाका होबारा यांच्याकडून १६-२१, २१-१७, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
























































