कतारला एकाकी पाडण्यासाठी सौदी अरेबिया खोदणार कालवा, आखाती देशांमधला वाद आणखी पेटला

46

सामना ऑनलाईन । रियाध

दहशतवादाची पाठराखण आणि सौदीविरोधी इराणशी जवळीक साधल्याच्या आरोपातून सौदी अरेबियासह संयुक्त अरब अमिरात, बाहरीन आणि इजिप्त या अरब राष्ट्रांनी संबंध तोडून टाकले आहेत. हा १४ महिने चाललेला वाद आता आणखी चिघळला आहे. कताराला सौदी भूमीपासून वेगळे पाडण्यासाठी सौदी अरेबियाने कतारी सीमेनजीक भव्य कालवा खोदण्याचा निर्णय घेतला आहे. या कालव्यामुळे कतारचे रूपांतर बेटात होऊन या देशाचा शेजारच्या देशांशी थेट संपर्क तुटणार आहे.

“आम्ही ऐतिहासिक सलवा आयलंड प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. सौदीचा हा मेगा कालवा प्रकल्प साकारल्यावर आखाती प्रदेशाची भौगोलिक रचनाच बदलणार आहे”, असे मत सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचे वरिष्ठ सल्लागार सौद अल कहतानी यांनी व्यक्त केले आहे.

६० किमी लांबीचा, अन २०० मीटर रुंदीचा कालवा 

कतारला वेगळे पाडण्यासाठी सौदी अरेबिया कतारी सीमेनजीक ६० किमी लांबीचा आणि २०० मीटर रुंदीचा भव्य कालवा खोदणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ७५०० डॉलर्स इतका होणार आहे. कालव्याचा एक भाग अण्वस्त्र कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या