
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली मराठवाडी-वरचीवाडी जयराम राजाराम सावंत यांच्या मालकीच्या विहिरीत गवा पडल्याची माहिती आंबवलीच्या सरपंचांनी वनविभागाला दिली. या गव्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून जीवदान देण्यात आले आहे. गवा विहिरीत पडल्याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले.
सावंत यांच्या विहिरीला कठडा नसल्याने व विहिरीवर ग्रीन शेडनेट असल्याने रानगव्याला अंदाज आला नाही. त्यामुळे तो विहिरीत पडला असावा , असा अंदाज वनपाल तौफिक मुल्ला यांनी व्यक्त केला. गवारेडा विहिरीत पडल्याचे कळताच ग्रामस्थ व वनविभाग कर्मचारीयांनी कुदळ, टीकाव, फावडे यांच्या मदतीने खोदकाम करुन गवारेड्यास बाहेर पडण्यास मार्ग तयार केला. त्याला सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर हा गवारेडा जंगलाच्या दिशेने पळून गेला. नर जातीचा हा गवारेडा सुमारे 4 वर्षाचा होता. यावेळी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे,सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक राहुल गुंठे, श.म.रणधीर यांसह कर्मचारी उपस्थित होते.




























































