
गेले काही महीने टिटवाळ्यात एका पतीने पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीला घरात कोंडून ठेवले होते. नवऱ्याकडून मानसिक आणि शारीरिक जाच सहन करणाऱ्या मुस्लिम समाजातील या सावित्रीची अखेर वटपौर्णिमेच्या दिवशी सुटका झाली. शिवसैनिक धावून आल्याने पीडित महिलेची सुटका झाली.
टिटवाळाजवळील बल्याणी परिसरातील माताजी मंदिर टेकडी परिसरात चाळीत राहणाऱ्या जमशेद गनी हा आपली पत्नी शगुप्ता व दीड वर्षांच्या चिमुकलीसह राहतो. कोरोनात त्याचा रोजगार गेला. गेले काही महीने जमशेद गनी हा घराबाहेर जाताना आपल्या पत्नीस घराच्या दरवाजाला कुलूप लावून पत्नी व मुलीस कोंडून निघून जात होता. जमशेद शगुप्ताला माहेरच्या लोकांसोबत संपर्क करू देत नव्हता. अखेर गोरेगाव येथे राहणारे तिचे वडील आणि भावाला शगुप्ताला त्रास होत असल्याचे समजले. त्यांनी ही बाब शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आणली. सुभाष देसाई यांनी तत्काळ कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यानुसार गोपाळ लांडगे यांनी शिवसैनिकांसह जमशेद गनी यांचा पत्ता शोधून घराचे टाळे तोडून शगुप्ता व तिच्या चिमुकलीची सुटका केली. यावेळी जयेश वाणी, दादा किस्मतराव, संतोष पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसैनिक माझे भाऊ
मी मुस्लिम असूनही आज मला माझ्या शिवसेनेच्या भावांनी मदत केल्याची भावना शगुप्ता यांनी व्यक्त केली. वटपौर्णिमेला एका सावित्रीची पतीच्या जाचातून मुक्तता करण्यात येऊन तिच्या इच्छेनुसार तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांनी सांगितले.
























































