एसबीआयचे कर्ज महागले; नव्या वर्षाआधीच ग्राहकांना जोरदार झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसला तरी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या दरात वाढ केली आहे. एसबीआयच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याने बँकेचे कर्ज महाग झाले आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे देशातील लाखो ग्राहकांना नव्या वर्षाआधीच जोरदार झटका बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून लोन घेणाऱया कर्जदारांना आता होम लोन, ऑटो लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एसबीआयने धन आधारित एमसीएलआरची घोषणा केली आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, एसबीआय एमसीएलआरचे नवे दर 15 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. एमसीएलआर दर आता 8 टक्क्यांहून थेट 8.85 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. ओव्हरनाइट एमसीएलआर दर 8 टक्के ठरवली आहे, तर एक महिना आणि तीन महिन्यांसाठी दर 8.15 टक्क्यांहून वाढून 8.20 टक्के करण्यात आले आहेत. सहा महिन्यांसाठी 8.55, एक वर्षासाठी 8.65, दोन वर्षांसाठी 8.75 आणि तीन वर्षांसाठी 8.85 टक्के एमसीएलआर दर असणार आहे. एसबीआय बँक ही देशातील आघाडीची बँक आहे. त्यामुळे अन्य बँकांही आपल्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.