महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष – सर्व याचिकांवर 13 जानेवारीला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या तिढय़ाबाबत दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी आता येत्या 13 जानेवारी रोजी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तसे आज नमूद केले.

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या ‘ईडी’ सरकारच्या वैधतेला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बंडखोर आमदारांची अपात्रता आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत दाखल सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीसाठी आता 13 जानेवारी ही तारीख निश्चित केली.

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी सुनावणीची पुढची तारीख लवकरची देण्याची विनंती केली. त्यावर पुढील आठवडा कामकाजाच्या दृष्टीने व्यस्ततेचा असल्याने घटनापीठापुढे सुनावणी घेणे शक्य नसल्याचे सरन्यायाधीशांनी नमूद केले व सर्व याचिकांवरील एकत्रित सुनावणी 13 जानेवारी रोजी ठेवू असे स्पष्ट केले.

घटनापीठातील एक न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांची तब्येत बिघडल्याने 29 नोव्हेंबर रोजीची सुनावणी होऊ शकली नव्हती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी सुरू आहे.