
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कला कोटय़ातील वाढीव गुणांसाठी शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी/इंटरमीजिएट) द्यावी लागते. यंदा ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतला आहे. या ऑनलाइन परीक्षेबाबतची माहिती व वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे एलिमेंटरी/इंटरमीजिएट परीक्षा न झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना कला कोटय़ाचे वाढीव गुण कसे देणार असा प्रश्न राज्य शिक्षण मंडळासमोर निर्माण झाला होता. विद्यार्थी आठवीत असताना एलिमेंटरी परीक्षेला बसतात. मार्च 2022 मध्ये दहावीच्या परीक्षेस बसणारे विद्यार्थी 2019 ला आठवीत होते. 2019 या वर्षी एलिमेंटरी परीक्षा झाली आहे. मात्र त्यानंतर ही परीक्षा झाली नाही. त्यामुळे एलिमेंटरीनंतर द्याव्या लागणाऱ्या इंटरमीजिएट परीक्षेला या विद्यार्थ्यांना बसता आले नाही. दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांचा लाभ घेण्यासाठी एलिमेंटरी व इंटरमीजिएट या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे इंटरमीजिएट परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना वाढीव गुण कसे मिळणार असा प्रश्न होता, पण आता कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला असून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेआधी शासकीय रेखाकला परीक्षा देता येणार आहे.
प्रस्तावासाठी मुदतवाढ द्या!
कला कोटय़ातील वाढीव गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेली मुदत 15 जानेवारी रोजी संपली आहे. बऱ्याच शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाला पाठविताना फक्त एलिमेंटरी पास झालेल्या आणि दोन्ही परीक्षा पास झालेले विद्यार्थी असे दोन वेगवेगळे प्रस्ताव पाठविले आहेत. कला संचालनालयाने परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यामुळे बोर्डाने कला कोटय़ाचे प्रस्ताव पाठविण्याची दिलेली मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे सहसचिव हिरामण पाटील यांनी केली आहे.





























































