
सातारा शहर परिसरातील एका शाळेत घुसून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. उमेश रमेश अवघडे (वय 33, रा. धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पीडित शाळकरी मुलगी ही दुपारी 1 वाजता मैत्रिणीसोबत शाळेच्या शौचालयात गेली होती. त्यावेळी त्याठिकाणी उमेश अवघडे हा तिथे आला. त्यावेळी त्याने पीडित मुलीला ‘तू मला आवडतेस, तुझ्या मैत्रिणीकडे माझा नंबर दिला, पण तू फोन का करत नाहीस’, असे म्हणत तिच्यासोबत त्याने अश्लील वर्तन केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकीन, अशी त्याने धमकीही दिली. भयभीत झालेल्या पीडित मुलीने जोरजोरात आरडाओरडा केल्यानंतर शाळेतील शिक्षक त्याठिकाणी धावून आले. हे दिसताच उमेश अवघडे हा तेथून पसार झाला.
या प्रकाराची माहिती मुलीच्या पालकांना देण्यात आल्यानंतर पालकांनी मुलीला घेऊन सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी उमेश अवघडे याच्यावर विनयभंगासह पोक्सोचाही गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.



























































