शाळा ट्रस्टींच्या मुलाचे शिक्षिकेला अश्लील मेसेज; डोंबिवलीत मानपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील अशोक खरात या भोंदूबाबाचे सेक्स स्कँडल संपूर्ण राज्यात गाजत असतानाच डोंबिवलीमध्येही एका शिक्षिकेची लैंगिक छळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सागाव परिसरातील जय भारत हायस्कूल या शाळेच्या ट्रस्टींच्या मुलाने एका शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून तिच्यावर अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

जय भारत हायस्कूलच्या ट्रस्टींचा मुलगा सरवना अय्यर याने शाळेतील एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. केवळ मेसेजच नव्हे, तर त्याने अश्लील व्हिडीओ पाठवून शिक्षिकेकडे शरीरसंबंधांची मागणीही केली होती. सततच्या या छळाला कंटाळून संबंधित शिक्षिकेने आपल्या आईसह सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत घेतली. त्यानुसार मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे आणि महिला पदाधिकारी कोमल पाटील हे कार्यकर्त्यांसह थेट शाळेत गेले. यावेळी शाळेत ट्रस्टी आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला तत्काळ आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सुमारे एक तास शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ट्रस्टींकडे त्यांच्या मुलाबाबत चौकशी केली. ट्रस्टींनी सहकार्य करत आपल्या मुलाला घराबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी सरवना अय्यर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.

माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याला कडक शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया यावेळी शाळेच्या ट्रस्टींनी व्यक्त केली.